‘कामगार आघाडी’चे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत (वय ९२) यांनी शुक्रवारी  गळफास घेऊन आत्महत्या केली. दादा सामंत यांच्या पश्चात पत्नी प्रमोदिनी, तीन विवाहित कन्या गीता, नीता आणि रुता, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे ते सासरे, तर कामगार आघाडीचे अध्यक्ष भूषण सामंत यांचे ते काका होत. प्रसिद्ध कामगार नेते दिवंगत डॉ. दत्ता सामंत यांचे ते मोठे बंधू होते. दादा सामंत यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडल्याचे समजते. परंतु, रात्री उशिरापर्यंत एकाही जबाबदार अधिकाऱ्याने आत्महत्येच्या वृत्तास दुजोरा दिला नव्हता. या प्रकरणी दहिसर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

दादा सामंत कुर्ला येथील नेहरू नगर परिसरात राहात. परंतु, गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या इमारतीचा पुनर्विकास सुरू असल्याने ते त्यांची मोठी कन्या गीता प्रभू यांच्या बोरिवली पूर्व येथील अभिनव नगर सोसायटीतील निवासस्थानी राहात होते. कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची १६ जानेवारी १९९७मध्ये हत्या झाली. त्यानंतर १८ जानेवारी १९९७ ते ९ मे २०११ पर्यंत ते कामगार आघाडीचे अध्यक्ष होते.

कामगार कायद्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. ‘दादा सामंत हे कामगार चळवळीतील एक महत्त्वाचे नाव होते. दत्ता सामंत यांच्यानंतर त्यांनी कामगार चळवळ पुन्हा एकदा नव्याने उभी के ली, अशा शब्दांत ‘ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस’चे राज्य सचिव राजू दिसले यांनी दु:ख व्यक्त केले.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि आरोग्य समस्यांमुळे आत्महत्या करत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहे. मात्र, त्यांना करोनाची लागण झाली नव्हती.