मुंबई/नवी दिल्ली :  केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगार-कर्मचारीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ विविध कामगार संघटनांनी बुधवारी देशव्यापी संप पुकारला आहे. त्याचा बँक, वाहतूक आणि अन्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

इंटक, आयटक, एचएमएस, सिटू यांच्यासह विविध संघटनांनी हा संप पुकारला आहे. कामगार मंत्रालयाने २ जानेवारी २०२० रोजी झालेल्या बैठकीत एकाही मागणीबाबत आश्वासन दिलेले नाही, असे १० कामगार संघटनांनी एका संयुक्त निवेदनामध्ये म्हटले आहे.

Salary of West Vidarbha Higher Education Department employees finally deposited
पश्चिम विदर्भातील उच्च शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अखेर जमा; ‘लोकसत्ता’च्या वृत्तानंतर प्रक्रियेला वेग
india demand of land marathi news
कार्यालयीन जागांच्या मागणीत ४३ टक्के वाढ, पहिल्या तिमाहीत १.६२ कोटी चौरस फुटांचे व्यवहार; बंगळूरुचा सर्वाधिक वाटा
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Transfer, social justice department
सामाजिक न्याय विभागात एकच अधिकारी दहा वर्षांपासून एकाच पदावर, पुन्हा नवीन कार्यभार…

सरकारी रुग्णालयांतील कर्मचारी संपात सहभागी

या संपामध्ये राज्य सरकारी रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थश्रेणीचे कर्मचारीही सहभागी होणार आहेत. परिचारिकांसह, तंत्रज्ञ आणि साफसफाई कर्मचाऱ्यांच्या कामबंद संपामुळे बुधवारी सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवा कोलमडण्याची शक्यता आहे. राज्यभरातील सरकारी रुग्णालयांसह जे.जे., जीटी, कामा, सेंट जॉर्ज रुग्णालयातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी बुधवारी संपावर जाणार आहेत. जे.जे. समूहामधील जवळपास साडे चार हजार कर्मचारी या संपामध्ये उतरले आहेत. त्यामुळे बुधवारी परिचारिका, तंत्रज्ञ आणि साफसफाई कर्मचारी यासह शस्त्रक्रियागृहातील कर्मचारीही कामावर हजर राहणार नाहीत. याचा रुग्णसेवेवर याचा नक्कीच परिणाम होईल. बुधवारी सकाळी सहा ते गुरुवारी सकाळी सहापर्यत हा संप सुरू असेल, असे जे.जे. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ राणे यांनी सांगितले.

शिवसेनेचा पाठिंबा

देशव्यापी कर्मचारी बंदला शिवसेनेने आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यात भाजपशी फारकत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाआघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेने या बंदला दिलेल्या पाठिंब्याला राजकीयदृष्ठय़ा महत्त्व आले आहे. विशेष म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीदेखील या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. केंद्र सरकारच्या अयोग्य धोरणांमुळे सर्वच क्षेत्रात देशाची पिछेहाट होत असल्याचा आरोप कामगार संयुक्त कृती समितीने केला आहे. शिवसेनाप्रणित सर्व संघटना आपापल्या आस्थापनांसह संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले. भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मुंबई विमानतळावर जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे.

महापालिकेचे लाखभर कर्मचारी सहभागी

मुंबई महापालिकेचे एक लाख दहा हजार कर्मचारी या आंदोलनात काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करतील, अशी माहिती मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी दिली आहे. या संपाला पालिकेतील आठ संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

काँग्रेसची मुंबईत निदर्शने 

मुंबई : मुंबईत विविध ठिकाणी पक्षातर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत, अशी माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांनी दिली.  मुंबईत कामगार संघटनांच्या वतीने लालबाग, आझाद मैदान, विमानतळ, चेंबूर, मुलुंड, ठाणे, नवी मुंबई, पनवेल अशा अनेक ठिकाणी मोर्चे काढून केंद्रातील भाजप सरकारविरोधात निदर्शने करण्यात येणार आहेत. या सर्व ठिकाणी काँग्रेस सहभागी होणार आहे. त्या दिवशी बस, टॅक्सी, रिक्षा, एस. टी. वाहतूक, टेम्पो, ट्रक व कारखाने बंद ठेवण्यात येणार आहेत. मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते भारतमाता, लालबाग व आझाद मैदान येथील मोर्चात व निदर्शनांमध्ये सहभागी होणार आहेत, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.

रेल्वे, बेस्ट, एसटी सुरळीत

संपाला रेल्वे, एसटी कामगार आणि बेस्ट संघटनांनी पाठिंबा दिला आहे. मात्र, संपात प्रत्यक्ष सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबई उपनगरी रेल्वे, बेस्ट व राज्यातील एसटी सेवा सुरळीत राहणार आहे. केवळ संपाला पाठिंबा असल्याचे  नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महासचिव वेणू नायर आणि वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉईज युनियनचे विभागीय सचिव प्रशांत कानडे यांनी सांगितले. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आणि महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनीही संपात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले.

‘रुग्णसेवेवर परिणाम होणार नाही’

चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांनी संप करत असल्याचे कळविले असून शासनाच्या आदेशानुसार हा नियमाच्या विरुद्ध आहे. रुग्णसेवेवर परिणाम होऊ नये यासाठी आम्ही होमगार्ड, कंत्राटी कामगार बुधवारी बोलाविले आहेत. अत्यावश्यक शस्त्रक्रियांव्यतिरिक्त इतर शस्त्रक्रिया कर्मचाऱ्यांच्या उपलब्धतेनुसार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याचे आदेश संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत. संपामुळे रुग्णसेवा कोलमडणार नाही, याची पूर्वतयारी आम्ही केलेली आहे, असे जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता  डॉ. पल्लवी सापळे यांनी सांगितले.