सुहास जोशी

कुटुंबासह शहर सोडणाऱ्यांची संख्या मोठी; एसटीऐवजी ट्रकचा वापर

स्थलांतरितांना राज्याच्या सीमेपर्यंत मोफत एसटी बसगाडी सुविधा सुरू केली असली तरी ट्रकने थेट आपले गाव गाठणाऱ्यांचे प्रमाण मंगळवारीही मोठे होते. यामध्ये कुटुंबकबिल्यासह प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसते आहे. तसेच, मजुरांसह छोटे व्यावसायिकही कुटुंबासह गावाचा रस्ता धरू लागले आहेत.

स्थलांतरितांसाठी सोमवारी मुंबई—आग्रा महामार्गावर ठाणे येथील तीन हात नाका, माजिवडा नाका, माणकोली आणि भिवंडी बायपास येथून एसटी बसगाडय़ा सुटू लागल्या. राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी अनेकजण त्या सुविधेचा लाभ घेत होते. मात्र केवळ सीमेपर्यंत जाण्याऐवजी थेट गावांपर्यंत जाणाऱ्या खच्चून भरलेल्या ट्रकचा वापरदेखील होत होता.

स्थलांतरितांना थेट गावापर्यंत सुविधा देणारी ट्रक, टेम्पो यंत्रणा गेल्या चार दिवसांत मोठय़ा प्रमाणात कार्यरत झाली. पन्नास—साठच्या संख्येने अत्यंत दाटीवाटीने भरलेले प्रवासी घेऊन ही वाहने उत्तर प्रदेश, झारखंड येथे जात आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत ठाणे ते भिवंडी बायपास या टप्प्यात ही वाहने आणि सामानसुमान घेऊन जाणाऱ्यांची प्रचंड मोठी रांग लागली होती. सोमवारपासून रस्त्यावरील रांग, गर्दी काही प्रमाणात कमी झाली. मात्र नाक्यावरील वाहनांची आणि स्थलांतरितांची गर्दी कायम होती.

माजीवडा नाका, माणकोली गाव येथील मोकळ्या जागा, मालवाहू वाहनाचे वाहनतळ, रस्तारुंदीकरणाचे काम अर्धवट राहिले असल्याने केवळ मातीचा भर घातलेली रिकामी जागा या ठिकाणी अशा वाहनांची गर्दी मोठय़ा प्रमाणात होती. वाटेत अनेक ठिकाणी सावली मिळेल तशी स्थलांतरित गाडीची वाट पाहत होते.

राज्याची सीमा ओलांडल्यानंतर काय?

एसटीने केवळ राज्याच्या सीमेपर्यंतच जाता येणार, त्यानंतरचा प्रवास कसा करायचा याची काहीच शाश्वती नसल्याने अनेकांनी थेट गावापर्यंत जाणाऱ्या ट्रकचा पर्याय घेतल्याचे सांगितले. विशेष म्हणजे गेल्या आठवडय़ात परराज्यातील प्रवासासाठी आकारले जाणारे भाडे सोमवारी पाचशे रूपयांनी कमी झाले.

दोन दिवसांत अधिक गर्दी

गेल्या आठवडय़ात पायी अथवा ट्रकने प्रवास करणाऱ्यामध्ये कुटुंबांची संख्या मर्यादित होती. गेल्या दोन दिवसात त्यामध्ये वाढ झाली. कुटुंबाकडून ट्रक आणि एसटी या दोन्ही साधनाचा वापर केला जात असल्याचे दिसले. त्याचबरोबर केवळ मजुरच नाही तर विविध छोटेमोठे व्यवसाय करणारे स्थलांतरितदेखील मोठय़ा संख्येने गावाकडे परतू लागले आहेत.