वर्षभरात १६ वाहनांची नोंद; चार्जिगसाठी सुविधा नसल्याने अडचण

पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या वाहनांतून होणारे वायुप्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून विजेवर धावणाऱ्या वाहनांना प्राधान्य दिले जात असले तरी ही वाहने ‘चार्ज’ करण्याकरिता पुरेसे ‘चार्जिग पॉइंट’ मुंबईत नाहीत. मुंबईत वर्षभरात विजेवरील चालणाऱ्या १६ चारचाकी वाहनांची नोंद झाली आहे. या प्रकारच्या वाहनांकरिता मुंबईसह राज्यभरात पुरेशा संख्येने ‘चार्जिग पॉइंट’ उपलब्ध करून दिल्यास अशी पर्यावरणकेंद्र वाहने जास्तीत जास्त रस्त्यावर येतील, अशी माहिती आरटीओतील सूत्रांनी दिली.

वाहनांतून होणारे प्रदूषण आणि दिवसेंदिवस डिझेलच्या वाढत जाणाऱ्या किमती यामुळे केंद्र सरकारकडून २०३० सालापर्यंत विजेवर चालणारी जास्तीत जास्त वाहने रस्त्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत विजेवर धावणाऱ्या १६ गाडय़ांची नोंद मुंबईतील आरटीओत झालेली आहे. यामध्ये ताडदेव आरटीओत नऊ, अंधेरी आणि बोरिवली आरटीओत प्रत्येकी तीन आणि एक गाडीची वडाळा आरटीओत नोंद झाल्याचे सांगण्यात आले. यात नुकतेच बेस्ट प्रशासनाकडूनही विजेवरील पाच बस ताफ्यात दाखल केलेल्या आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे विजेवरील वाहने जरी दाखल करण्यात येत असली तरी त्यासाठी लागणारे चार्जिग पॉइंट असणेही गरजेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. बेस्टकडून त्यांच्या आगारात विजेवरील बससाठी चार्जिगची व्यवस्था केलेली आहे. मात्र अन्य वाहनांसाठी फक्त एका कंपनीकडून विक्रोळी येथे चार्जिग पॉइंटची व्यवस्था ऑगस्ट २०१७ मध्ये उपलब्ध केली होती. त्यानंतर चार्जिग पॉइंटच्या संख्येत अद्याप वाढ झालेली नाही. त्यामुळे असे पॉइंट उपलब्ध झाल्यास वाहनचालकांची गैरसोयही होणार नाही, असे सांगण्यात आले.

विजेवरील चारचाकी वाहने ही महाग असतात आणि त्यांना चार्जिगसाठी लागणारे साहित्य हे त्या-त्या वाहन मालकाला उपलब्ध केले जाते. मात्र वाहन चार्ज केल्यानंतर ते ठरवून दिलेल्या किलोमीटरपेक्षाही जास्त किलोमीटर वाहन धावल्यानंतर मोठी समस्या त्या चालकाला येऊ शकते. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रात चार्जिग पॉइंटची गरज असल्याचे मत आरटीओतील अधिकारी व्यक्त करतात.

‘टेस्ला’ची ताडदेवमध्ये नोंदणी

मुंबईतील ताडदेव आरटीओत परदेशातून आलेल्या ‘टेस्ला’ या विजेवरील चालणाऱ्या आलिशान वाहनाची नोंद करण्यात आली आहे. विजेवर चालणारे हे मुंबईतील पहिले वाहन आहे. दोन कोटी ८९ लाख रुपये किंमत असलेल्या या गाडीमध्ये अनेक सुविधा आहेत. प्रदूषण टाळतानाच वाहनचालकाच्या सुरक्षेची पुरेपूर काळजीही घेण्यात आली आहे. आठ कॅमेरे आणि १२ अल्ट्रासोनिक सेन्सर असून त्यामुळे वाहनचालकाला ऊन, वारा, पाऊस, धूर यातूनही गाडी व्यवस्थितपणे चालविता येईल. ही गाडी २.९ सेकंदांत ताशी ६० किलोमीटर वेगाने जाऊ शकते. एकदा चार्ज केले की साधारण ३०० किलोमीटपर्यंत गाडी चालविणे शक्य आहे.