भविष्यात समस्या आणखी वाढण्याची भीती
अगामी तीन वर्षांत नागरी सुविधांच्या अभावामुळे मुंबईतील उच्चभ्रू परिसर समजला जाणारे मलबार हिल तसेच कुर्ला आणि मालाड आदींची परिस्थिती बिकट होण्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘प्रजा फाऊंडेशनच्या’ वार्षिक अहवालात ही चिंता व्यक्त करण्यात आली असून यात पाण्याचा अपुरा पुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, प्रदूषण, कचरा आदी समस्या भविष्यात वाढणार असल्याची भीती व्यक्त केली आहे.
मुंबईतील मलबार हिल परिसर उच्चभ्रू नागरिकांच्या वसाहतींसाठी व कोटय़वधीच्या घरांसाठी प्रसिद्ध आहे. मात्र, महापालिकेकडून या भागात पुरविण्यात येणाऱ्या नागरी सुविधांची येथे वानवा असल्याचे आढळून आल्याने येत्या तीन वर्षांत नागरी सुविधांअभावी येथील परिस्थिती गंभीर होणार असून याचबरोबरीने आधीच खराब परिस्थिती असलेल्या मालाड व कुर्ला या उपनगरांचीही भविष्यात बिकट अवस्था होणार असल्याचा दावा ‘प्रजा फाऊंडेशन’ने त्यांच्या अहवालाद्वारे केला आहे. परिणामी स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार असल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले. पाण्यातील प्रदूषणामुळे डायरियासारख्या गंभीर आजारांना बळी पडलेल्यांमध्ये अंधेरी पश्चिमेकडील के-पश्चिम, वरळी जी-दक्षिण विभाग आणि मलबार हिल डी-विभाग आदींचा समावेश असून येत्या काही काळात येथील परिस्थिती अजून खालवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ‘प्रजा फाऊंडेशन’ने हा दावा करताना २००८ ते २०१५ दरम्यान या भागातून मोठय़ा प्रमाणावर प्राप्त झालेल्या तक्रारींचा आधार घेतला आहे. भांडुप, घाटकोपर, डोंगरी येथे डेंग्यू व मलेरियामुळे झालेल्या मृत्यूंचे प्रमाण वाढले असून त्रास येत्या काळात वाढणार असल्याचे २०११ ते २०१५ प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने अहवालात नमूद करण्यात आले आहे. प्रभागनिहाय अहवाल तयार केल्याने पालिका प्रशासनाचे डोळे उघडण्यास यामुळे मदत होणार असून प्रभागात चांगल्या सुविधा देणे भाग पडणार आहे. पालिकेकडे या समस्या सोडविण्यासाठी पुरेसा निधी असून त्यांनी तो योग्यरित्या वापरणे आवश्यक असल्याचे ‘प्रजा फाऊंडेशन’कडून स्पष्ट करण्यात आले.