‘कोल इंडिया’कडून कोळशाचा अपुरा पुरवठा होत असल्याने इंधन टंचाईचा फटका राज्यातील खापरखेडा या ‘महानिर्मिती’च्या वीजप्रकल्पास बसला असून या प्रकल्पातील २१० मेगावॉटचा एक वीजनिर्मिती संच कोळशाअभावी बंद करण्यात आला आहे.
विदर्भात खापरखेडा येथे ‘महानिर्मिती’चा १३४० मेगावॉटचा वीजप्रकल्प आहे. त्यात २१० मेगावॉटचा चार आणि ५०० मेगावॉटचा एक अशारितीने एकूण १३४० मेगावॉटचे वीजनिर्मिती पाच संच आहेत. या पाच वीजनिर्मिती संचांसाठी रोज २५ हजार टन कोळशाची गरज भासते. पण ‘कोल इंडिया’कडून अवघा १३ हजार मेट्रिक टन म्हणजेच जवळपास निम्मा कोळसाच उपलब्ध होत आहे. कोळशाची सतत टंचाई भासत असल्याने सर्व वीजनिर्मिती संच अपुऱ्या क्षमतेने सुरू आहेत. कोळसा टंचाई संपण्याचे चिन्हे दिसत नसल्याने आता २१० मेगावॉटचा एक वीजनिर्मिती संच तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खापरखेडामधील वीजनिर्मितीचे प्रमाण त्यामुळे ८०५ मेगावॉटवर आले आहे.
खापरखेडा वीजप्रकल्पाला ‘कोल इंडिया’च्या वेस्टर्न कोल फिल्ड्स, महानदी कोल लिमिटेड, दक्षिण पूर्व कोल लि. या उपकंपन्यांच्या खाणींमधून कोळसा पुरवला जातो. सतत अपुरा कोळसा मिळत असल्याने वीजनिर्मितीवर परिणाम होत आहे. आता एक वीजसंच बंद ठेवण्यात आल्यानंतर पुरेसा कोळसा मिळवण्यासाठी ‘महानिर्मिती’ने पाठपुरावा सुरू केला आहे.
‘महानिर्मिती’ची औष्णिक वीजनिर्मिती क्षमता ७४८० मेगावॉट असून सध्या ४६५८ मेगावॉट वीजनिर्मिती सुरू आहे. ती अपेक्षेपेक्षा एक हजार मेगावॉटने कमी आहे. बाहेरून वीज घेऊन विजेची तूट भरून काढण्याचे प्रयत्न करण्यात येत असून तरीही उपलब्धता कमी असल्याने राज्यात भारनियमन करण्यात येत आहे.