25 March 2019

News Flash

पायाभूत सुविधांसाठी भरीव गुंतवणूक

मोटर सायकलीत ८.६ टक्के, रिक्षामध्ये ११ टक्यांची वाढ

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

राज्याच्या सवांगीण प्रगतीसाठी उत्पादकता वाढविण्याबरोबरच सामाजिक, आर्थिक शाश्वत विकासासाठी कार्यक्षम वाहतूक आणि दळणवळण व्यवस्था महत्वाची असल्यामुळे राज्य सरकारने पायाभूत सुविधा क्षेत्रावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यातील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये करण्यात आलेल्या गुंतवणूकीमुळे महाराष्ट्र सध्या देशात अव्वल असून पायाभूत सुविधा प्रकल्पातील गुंतवणुकीत ११ टक्के वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील  वस्त्या  बारमाही रस्त्याने जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची अंमलबजावणी मात्र रेंगाळल्याचे आर्थिक पाहणी अहवालातून समोर आले आहे.

राज्यात तीन लाख ३७८ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दीष्ट ठेवून सरकारने रस्ते विकास आराखडय़ाची(सन २००१-२१) अंमलबजावणी सुरू केली आहे. केंद्रीय रस्ते निधी योजनेंतर्गत राज्यात सन २०१६-१७मध्ये  १२३३ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची आणि तीन हजार१०६ कोटी रूपये खर्चाची १७० कामे मंजूर झाली होती. त्यापैकी केवळ चार कामे पूर्ण झाली आहेत. तर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन २०१७-१८मध्ये २७ हजार२०७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांनी आठ हजार ८०८ गावे जोडण्याचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले असून त्यापैकी नोव्हेंबर २०१७ अखेर ८ हजार ५८४ वस्त्या जोडण्यात आल्या आहेत. मात्र मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी परिणामकारक होत नसल्याचेही आर्थिक पाहणीतून समोर आले आहे. रस्त्यांनी न जोडलेल्या वस्त्यांना जोडणे आणि ग्रामीण रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य सरकारने  ऑक्टोबर २०१५पासून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून मार्च २०१७ पर्यंत आठ हजार ६३४ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. मात्र डिसेंबर पर्यंत केवळ एक हजार ६१४ किमी लांबीच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्यात आला आहे.

मोटर सायकलीत ८.६ टक्के, रिक्षामध्ये ११ टक्यांची वाढ

राज्यात १ जानेवारी २०१८ अखेर तीन कोटी १४ लाख वाहने असून असून दर लाख लोकसंख्येमागे २५ हजार ८५९ वाहने आहेत. म्हणजेच मागील वर्षांच्या दोन कोटी ९१ लाखच्या तुलनेत ७. ६ टक्यांन वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यातील एकूण वाहनांपैकी  ७.७ टक्के म्हणजेच ३१.७९ लाख वाहने मुंबईत आहेत. राज्यात प्रति किलोमीटर रस्त्यावरील वाहनांची सरासरी संख्या १०४ आहे. राज्यातील  दुचाकी वाहनांची संख्या दोन कोटी तीन लाख असून मुंबईत हीच संख्या एक कोटी आठ लाखाच्या घरात आहे. मार्च २०१७ अखेर मोटर वाहन चालविणाच्या वैध परवान्यांची संख्या ३२९.५९ लाख होती. तर शिकावू परवाने धारकांची संख्या २५.५ लाख होती. मागील वर्षी राज्यात झालेल्या रस्ते अपघाताची संख्या ३५ हजार ८५३ असून त्यात  १२ हजार २६४ लोकांचा बळी गेला आहे. तर मुंबईत तीन हजार १६० अपघातांची नोंद झाली असून त्यात ४९० लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात इंटरनेट वापरणाऱ्यांची देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक असून ५.४५ कोटी लोक इंटरनेट वापरत आहेत. तर दूरध्वनी  जोडण्यांची संख्या ४८.३८ लाख असून  दर लाख लोकसंख्येमागे दूरध्वनी आणि भ्रमणध्वनी वापरणाऱ्यांची संख्या अनुक्रमे ३,९८५ व  एक लाख आठ हजार ८७४  आहे. राज्यात आयडिया फोन धारकांची संख्या सर्वधिक तीन कोटी १३ लाख असून वोडाफोन धारकांची संख्या दोन कोटी ८३ लाख,  तर रिलायन्स फोन धारकांची संख्या २ कोटी ३९ लाख आहे. एमटीएनएल मोबाईल धारकांची संख्या फक्त १३ लाख आहे.

एसटीचे प्रवासी घटले

गेल्या वर्षी राज्य परिवहन महामंडळाने( एसटी) प्रतिदिन सरासरी ६६.९५ लाख प्रवासांची वाहतूक केली असून मागील वर्षांच्या तुलनेत एसटीच्या प्रवाशांमध्ये १.४ टक्यांनी घट झाली आहे. तर बेस्टच्या प्रवाशांची प्रती दिन सरासरी २८.९९ लाखावरून २८.३४ लाख अशी घसरली आहे. उपनगरीय रेल्वेच्या विविध मार्गावरील २५८ गाडय़ा  दोन हजार ९७९ फेऱ्यांच्या माध्यमातून सरासरी ७६.५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. रेल्वे अपघातामध्ये गेल्या वर्षभरात तीन हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला असून तीन हजार ३४५ लोक जखमी झाले आहेत.

देशांतर्गत प्रवासी संख्येत ११ टक्यांनी वाढ

राज्यात तीन आंतरराष्ट्रीय व १३ देशांतर्गत विमानतळ आहेत. देशांतर्गत प्रवाशांची संख्या तीन कोटी ७२ लाखावरून चार कोटी १५ लाखावर पोहोचली असून ही वाढ ११.५ टक्के आहे. तर आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या आठ टक्यांनी वाढून एक कोटी १९ लाख वरून एक कोटी २८ लाख झाली.

 

First Published on March 9, 2018 12:57 am

Web Title: lack of development in maharashtra 2