22 February 2019

News Flash

सूक्ष्म पातळीवर नियोजन आवश्यक

पाणी तुंबण्यापासून मुंबईची सुटका करण्यासाठी आयुक्तांचे मत

पाणी तुंबण्यापासून मुंबईची सुटका करण्यासाठी आयुक्तांचे मत

शहरातील पाणी तुंबणाऱ्या ठिकाणांचा आढावा घेतल्यावर सूक्ष्म पातळीवर नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे मत आयुक्त अजोय मेहता यांनी स्थायी समितीच्या बैठकीत व्यक्त केले. शहरातील पाणी तुंबण्याची ठिकाणे बदलत असून त्यानुसार नियोजनातही बदल करायला हवा, असे सांगताना त्यांनी शहराच्या काँक्रिटीकरणाची समस्या मान्य केली.

मुसळधार पावसामुळे शहराच्या बिघडलेल्या स्थितीबद्दल स्थायी समितीत बुधवारी विरोधी पक्षांनी आवाज उठवून आयुक्तांकडून स्पष्टीकरणाची मागणी केली. भर पावसात उदंचन केंद्र योग्य रीतीने काम करत नसल्याचे वारंवार लक्षात येते असा आरोप नगरसेवकांनी केला होता. उदंचन केंद्रामुळे शहरातील सखल भागातील पाणी तुंबण्याची समस्या काही प्रमाणात दूर झाली, मात्र पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सूक्ष्म पातळीवर नियोजन करणे आवश्यक असल्याचे मत आयुक्त अजोय मेहता यांनी व्यक्त केले. अनेक ठिकाणी जलवाहिनीत झाडांची मुळे जाऊन त्या बंद झाल्या होत्या. काही ठिकाणी केबलच्या जाळ्यांमुळे तर काही ठिकाणी जलवाहिन्यांमधून गळती होत असल्याने पाणी तुंबण्याची समस्या होती. या समस्या दूर केल्यावर शहरातील २२५ पैकी १२० ठिकाणी पाणी तुंबण्याची समस्या सुटली असे आयुक्तांनी सांगितले. शहरात पाणी साठण्याची ठिकाणे तसेच समस्यांचे स्वरूप बदलत आहे त्यानुसार उपायही बदलायला हवेत. यावेळी मलनिसारण वाहिन्यांमधूनही पावसाळ्यातील पाणी सोडण्याचा प्रयोग करण्यात आला. त्यामुळे मिलन सबवे येथील पाण्याचा लवकर निचरा झाला. मात्र शहरात काँक्रिटीकरणाची समस्या असून नवीन विकास नियंत्रण नियमावलीत बांधकाम करतेवेळी विशिष्ट प्रमाणात जागा मोकळी सोडणे अनिवार्य केल्याचे मेहता म्हणाले.

गांधी मार्केटमध्ये पाणी तुंबणारच..

पश्चिम किनारपट्टीवर पाच पाणी उपसा केंद्रे उभी राहिली असली तरी पूर्व किनारपट्टीवर ब्रिटानिका हे एकमेव केंद्र आहे. माहुल येथील केंद्राची जमीन मिठागरांमध्ये येत असून त्याबाबत अद्याप परवानगी आलेली नाही. त्यामुळे गांधी मार्केटमधील पाणी उपसण्यासाठी तात्कालिक प्रयत्न केले तरी येथील पाणी तुंबण्याची समस्या कायमस्वरूपी सुटणे शक्य नसल्याचे आयुक्त मेहता यांनी स्पष्ट केले.

नगरसेवकांना कानपिचक्या

वॉर्डमध्ये अधिकारी, कर्मचारी जागेवर नसतात, नगरसेवकांना योग्य ती माहिती दिली जात नाही, असा आरोप नगरसेवकांनी केला होता. पालिकेचे साडेतीन – चार हजार कर्मचारी पाण्याचा निचरा होण्यासाठी भरपावसात रस्त्यांवर होते. त्यांना इंग्रजी बोलता येत नसले, त्यांचे कपडे झकपक नसले तरी त्यांच्याबद्दल आपण आदर व्यक्त करायला हवा, असे आयुक्त म्हणाले. त्याचवेळी नगरसेवकांनी आपत्कालीन स्थितीत वॉर्डमध्ये उपस्थित राहावे म्हणजे त्यांना माहिती मिळेल, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. त्यावर नगरसेवकांनी अल्प आवाजात निषेधाचा सूर लावला. आयुक्त बैठकीतून निघून गेल्यावर मात्र त्यांचा जोरदार शब्दांमध्ये निषेध करण्यात आला.

 

First Published on July 12, 2018 1:57 am

Web Title: lack of disaster team in mumbai