डॉक्टरांच्या ७५७० जागा रिक्त; ४०० निवृत्तीच्या मार्गावर

राज्यात डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची जवळपास २० हजार पदे रिक्त असल्याने सरकारी रुग्णालये ओस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तब्बल ७५७० डॉक्टरांची पदे रिक्त असून, येत्या मे महिन्यात सुमारे ४०० डॉक्टर नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. आरोग्य सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील सरकारी डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करावी, अशी डॉक्टरांची मागणी आहे. परंतु त्याबाबत शासनस्तरावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

राज्यात ५० हजार प्राथमिक केंद्रे, ८ हजार उपकेंद्रे, २३ जिल्हा रुग्णालये, ३८७ उपजिल्हा रुग्णालये आहेत. ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंतच्या सर्वसामान्य जनतेला सरकारी रुग्णालयांमधून आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्या जातात. परंतु गेल्या काही वर्षांत सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांची संख्या कमी होऊ लागली आहे. आरोग्य विभागाने तीन वर्षांपूर्वी त्याचा आढावा घेतला होता. त्या वेळी वैद्यकीय अधिकारी व वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे सरकारी रुग्णालयांमधून रुग्णांना वेळेत व योग्य आरोग्य सेवा पुरविण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे आढळून आले होते. त्याचा विचार करून वरिष्ठ वेतनश्रेणी असणाऱ्या डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्याचा निर्णय घेतला होता. ३१ मे २०१५ पासून लागू करण्यात आलेला हा निर्णय फक्त तीन वर्षांसाठी होता. त्यामुळे आता येत्या मे अखेपर्यंत मोठय़ा प्रमाणावर वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी निवृत्त होत आहेत.

केंद्र सरकारने केंद्रीय आरोग्य सेवा संचालनालय, संरक्षण दल वैद्यकीय सेवा, भारतीय रेल्वे वैद्यकीय सेवा, ऑर्डनन्स फॅक्टरी वैद्यकीय सेवा, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आरोग्य सेवा, इत्यादी सेवेतील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधीची अधिसूचना ५ जानेवारी २०१८ रोजी काढण्यात आली आहे.

राज्यात वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणारी वैद्यकीय महाविद्यालये व त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवृत्तीचे वय ६४ करण्यात आले आहे. मात्र आरोग्य सेवा संचालनालयातील व त्यांच्याशी संलग्न रुग्णालयांतील तसेच जिल्हा परिषदांच्या आरोग्य सेवेतील डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ५८ वर्षे आहे.

आरोग्य विभागातील सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मिळून ७२ हजार मंजूर पदे आहेत. त्यातील २० हजार ३६० पदे रिक्त आहेत. त्यात ७ ५७० डॉक्टरांच्या पदांचा समावेश आहे. त्यातील ४६६ विशेषज्ञ डॉक्टरांची पदे भरलेली नाहीत.

निवृत्तीचे वय वाढविण्याची मागणी

आरोग्य सेवेतील रिक्त पदांची ही स्थिती लक्षात घेऊन आणि येत्या तीन महिन्यांत सुमारे ४०० डॉक्टर एकाच वेळी निवृत्त होणार असल्याने त्याचा आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होणार आहे. त्यामुळे केंद्राप्रमाणे डॉक्टरांचे निवृत्तीचे वय ६५ वर्षे करावे, अशी डॉक्टरांची मागणी आहे. या संदर्भात काही डॉक्टरांनी राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत व मुख्य सचिव सुमित मलिक यांना निवेदने दिली आहेत. मात्र त्याबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही. या संदर्भात दीपक सावंत यांच्याशी अनेकदा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

  • राज्यात ५० हजार प्राथमिक केंद्रे, ८ हजार उपकेंद्रे, २३ जिल्हा रुग्णालये, ३८७ उपजिल्हा रुग्णालये आहेत.
  • डॉक्टर व कर्मचाऱ्यांची मिळून ७२ हजार मंजूर पदे आहेत. त्यातील २० हजार ३६० पदे रिक्त आहेत. त्यात ७ ५७० डॉक्टरांच्या पदांचा समावेश आहे.
  • आरोग्य सेवेतील रिक्त पदांची ही स्थिती लक्षात घेऊन आणि येत्या तीन महिन्यांत सुमारे ४०० डॉक्टर एकाच वेळी निवृत्त होणार असल्याने त्याचा आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होणार आहे.