X
X

देशात कर्णबधिरांना शिक्षणाच्या अपुऱ्या संधी

READ IN APP

आजही आपल्या देशात कर्णबधिरांसाठी शिक्षणाच्या अपुऱ्या संधी आहेत.

अमेरिकेतून पदवी मिळवलेल्या अकिल चिनॉयची खंत
आजही आपल्या देशात कर्णबधिरांसाठी शिक्षणाच्या अपुऱ्या संधी आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी सांकेतिक भाषेची गरज असते. त्याची सुविधा आपल्याकडे नसल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणे कठीण जाते. अमेरिकेत शिकत असताना आम्हाला या भाषेचे महत्त्व कळले आणि त्या जोरावरच मी यशस्वी झाल्याचा विश्वास अमेरिकेत संगणक विज्ञान शाखेत पदवीधर झालेला अकिल चिनॉय या विद्यार्थ्यांने व्यक्त केला.
लहानपणापासून मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या अकिलचे कुटुंब कर्णबधिर आहे. अकिलने चांगले शिक्षण घ्यावे या उद्देशाने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला अमेरिकेत पाठविले. चर्चगेट येथील ‘एज्युकेशन यूएसए’ या अमेरिकेच्या अधिकृत शैक्षणिक संस्थेच्या मदतीने अकिलने जगातील एकमेव कर्णबधिर विद्यापीठ असलेल्या गॅलॉड विद्यापीठात प्रवेश मिळवला. तेथील शिक्षणपद्धती खूपच प्रगत असून कर्णबधिर विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाणारी असल्याचे अकिलने सांगितले. शिक्षण संपवून परत आल्यावर एका शिपिंग कंपनीत त्याने नोकरी स्वीकारली. तेथील कार्यप्रणालीत तंत्रज्ञानाचा समावेश करून कंपनीचे कामकाज अधिक सुलभ केल्याचे अकिलने सांगितले. आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी ‘इन्स्पायर अलाइव्ह’ नावाची कंपनी स्थापन करून डिजिटल आणि सांकेतिक भाषेत प्रशिक्षण देण्याचे काम तो करत आहे. सध्या भारतात अशा प्रकारे काही संस्था शिक्षण देत आहेत. मात्र त्यांची संख्या अत्यल्प आहे. भारतीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी मुंबईतील अमेरिकन दूतावासात गुरुवारी ‘विद्यार्थी व्हिसा दिवस’ आयोजित करण्यात आला होता. या वेळी अमेरिकेच्या वकिलाती विभागाचे प्रमुख माईक एवन्स, एज्युकेशन यूएसएचे रायन परेरा आदी उपस्थित होते.

कमी गुणांनंतरही परदेशी शिक्षणाची कवाडे खुली
अमेरिकेसारख्या परदेशात उच्च शिक्षणाचे धडे गिरविण्यासाठी चांगले गुण असणे गरजेचे असल्याचे बोलले जाते. मात्र हा सर्वसामान्य समज मुंबईच्या मनमोहन थोरात या विद्यार्थ्यांने खोटा ठरविला आहे. बारावीला ६१ टक्के आणि गणितात केवळ ३५ गुण मिळवणारा मनमोहन सध्या अमेरिकेतील ओक्लाहोम विद्यापीठात अभियांत्रिकीच्या मेकॅनिकल शाखेत शिक्षण घेत असून आशियाई अमेरिका विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्षही आहे.
‘त्यांच्यासाठी कम्युनिटी सेंटर सुरू करायचेय’
श्वेता कट्टी ही कामाठीपुरातून अमेरिकेत जाणारी भारतातील पहिली विद्यार्थिनी आहे. तिने अमेरिकेत जाऊन शिक्षण पूर्ण केले आहे. आता या भागातील अन्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे श्वेताने निश्चित केले आहे. त्यासाठी कामाठीपुरा भागात एक समाज केंद्र उभारायची तिची इच्छा आहे.
मुंबईत १२०० विद्यार्थ्यांचे अर्ज
अमेरिकेत दूतावासात गुरुवारी आयोजित व्हिसा दिनानिमित्त देशभरातून चार हजार तर मुंबईतून १२०० विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती एवन्स यांनी दिली. तर या संख्येत वाढ झाली नसून ती मागच्या वर्षीच्या संख्येइतकीच असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले.

21
X