पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला पूर्ण बहुमत असल्याने कदाचित त्यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)ची गरज वाटत नसावी, असे टीकास्त्र सोडत ‘आता संवाद राहिलेला नाही,’ अशी खंत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. देशात वातावरण बदलत असल्याने या मानसिकतेत ‘रालोआ’चीच गरज भासणार आहे, असा इशारा राऊत यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला दिला आहे. रालोआची बैठक बोलाविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.
संसद अधिवेशनास सोमवारपासून सुरुवात होत असताना रालोआतील घटकपक्ष असलेल्या आणि केंद्रात व राज्यात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने भाजप नेतृत्वावर टीकेची झोड उठविली आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या काळात ‘रालोआ’चे महत्त्व होते, आता या सरकारला रालोआची गरज वाटत नसावी, असे मत राऊत यांनी व्यक्त केले आहे. पण आता काळ आणि वातावरण बदलत आहे. देशात आणि राज्यात यापुढेही निवडणुका होणार आहेत आणि बदलत्या मानसिकतेमध्ये रालोआची गरज भासणार असल्याचे राऊत यांनी भाजप नेतृत्वाला सुनावले आहे. वाजपेयी आणि अडवानी यांच्या काळात रालोआच्या नियमित बैठका होत असत, पण आता त्या होत नाहीत. पंतप्रधानपदी मोदी यांची निवड करण्याच्या वेळी रालोआची बैठक झाली. त्यानंतर झालीच नाही. गेली १० वर्षे सत्ता नसताना शिवसेना आणि अकाली दलच रालोआमध्ये राहिले, याची आठवण करून दिली. रालोआ टिकली, तरच विरोधकांचे हल्ले एकजुटीने परतवता येऊ शकतील, असे राऊत यांनी स्पष्ट केले.