मधु कांबळे

केंद्रीय नियमावलीत फक्त राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा समावेश

शासकीय इतमामात कोणावर अंत्यसंस्कार करावेत, याबाबत केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्याचे राज्य सरकारांना पालन करावे लागते. त्यात फक्त राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या पार्थिवांवर शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्याची तरतूद आहे. राज्य सरकारचे त्याबाबतचे स्वतंत्र धोरणच नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्य सरकाररचे कोणतेही धोरण नसतानाही गेल्या सात वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रातील ६० मान्यवरांच्या पार्थिवांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात ४० राजकीय व्यक्तींचा समावेश आहे. काही प्रसिद्ध व्यक्तींच्या पार्थिवांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले नाहीत, म्हणून सरकारवर टीका झाली. परंतु राज्याची त्याबाबत स्वतंत्र नियमावली नाही, केंद्र सरकारच्याच नियमांचे पालन करावे लागते. त्यामुळे एखादी व्यक्ती प्रसिद्ध असेल, पद्मश्रीसारख्या पुरस्काराने सन्मानित आहे, म्हणून तिच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करता येत नाहीत, असे सामान्य प्रशासन विभागातून सांगण्यात आले.

क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नाहीत, म्हणून वाद उद्भवला होता. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्यात आले, मात्र पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविण्यात आलेल्या आचरेकरांवर मात्र शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचा सरकारला विसर पडला, अशी टीका माध्यमांनी केली होती.

यासंदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून (राजशिष्टाचार) माहिती अधिकारात तपशील उपलब्ध झाला आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कोणावर करावेत, याबाबतची केंद्र वा राज्य सरकारची नियमावली किंवा धोरण आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मान्यवर व्यक्तींची नावे, अशी माहिती देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु मंत्रालयाला लागलेल्या आगीत बऱ्याच फायली जळून खाक झाल्यामुळे २१ जून २०१२ नंतरची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार कोणावर करावेत, याबाबत राज्य शासनाने कोणत्याही मार्गदर्शक सूचना वा नियम केलेले नाहीत, असे या विभागाने कळविले आहे.

राज्यात १७ जुलै २०१२ ते १४ जानेवारी २०१९ पर्यंत विविध क्षेत्रांतील ६० मान्यवरांच्या पार्थिवांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यात माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अ. र. अंतुले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्येष्ठ समाजवादी नेत्या मृणाल गोरे, माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर, शंकरराव जगताप, माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया, माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, माजी नायब राज्यपाल रामभाऊ कापसे, शेतकरी नेते शरद जोशी, विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे, शिवाजीराव देशमुख, उपसभापती वसंत डावखरे, माजी मंत्री पांडुरंग फुंडकर, माजी केंद्रीय मंत्री गुरुदास कामत आदी राजकीय क्षेत्रातील ४० मान्यवरांचा समावेश आहे. सहा पद्म पुरस्काराने सन्मानित मान्यवरांचा समावेश आहे.

केंद्राची नियमावली

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक नियमावलीत राष्ट्रपती, माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या पार्थिवांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याची तरतूद आहे. राज्यातील अन्य मान्यवर व्यक्तींच्या पार्थिवांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याबाबतचे अधिकार राज्य सरकारला असले तरी, त्यासाठी राज्य सरकारला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आदेश घ्यावे लागतात, असे त्यात म्हटले आहे.

‘राज्याचे स्वतंत्र धोरण प्रस्तावित’

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याबाबतचे राज्य सरकारचे धोरण किंवा नियम सध्या नाहीत. मुख्यमंत्र्यांना त्याबाबतचे अधिकार आहेत. त्यानुसार काही अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या निधनानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र अलीकडे काही प्रकरणात वाद निर्माण झाला. त्यामुळे शासकीय इतमामात अंत्यसस्कार करण्याबाबतचे राज्याचे धोरण तयार करण्यात येत आहे, त्याचे काम सुरू आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे (राजशिष्टाचार) प्रधान सचिव नंदकुमार यांनी दिली.