20 October 2020

News Flash

विकासकांना मजूरचिंता

बांधकाम क्षेत्रात कुशल कामगारांची कमतरता

बांधकाम क्षेत्रात कुशल कामगारांची कमतरता

निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई: करोना विषाणू फैलावाच्या प्रतिबंधासाठी पाचवी टाळेबंदी लागू झाली आहे. काही दिवसांत मार्गदर्शक सूचना जारी करून बांधकामांना परवानगी मिळण्याची शक्यता आहे. परंतु मजुरांची वानवा आणि तोंडावर आलेला पावसाळा यामुळे पावसाळ्यानंतरच प्रत्यक्ष बांधकाम सुरू करता येईल, असे विकासकांचे म्हणणे आहे.

केंद्र सरकारने विकासकांना रेरा कायद्यातून सहा महिन्यांसाठी सवलत दिली आहे. त्याच वेळी ग्राहकांनाही पैसे भरण्यात सूट मिळाली आहे. या सहा महिन्यांत विकासक ग्राहकांकडून घरांचे हप्ते घेऊ शकत नाहीत. त्याचबरोबर ग्राहकांना द्यावयाच्या व्याजावरही विकासकांना सूट मिळाली आहे. मात्र सहा महिन्यांनंतर विकासक आणि ग्राहक यांना आपआपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. अशा वेळी लाल क्षेत्रात न मोडणाऱ्या विभागांमध्ये बांधकामांना परवानगी देण्यात आली असली तरी मजूर नसल्याने कामाने वेग पकडलेला नाही. मजूर असलेल्या बांधकामांना पालिकेने परवानगी दिली असली तरी यापैकी अनेक मजूर आपापल्या गावी निघून गेले आहेत. परिणामी, परवानगी मिळूनही विकासकांना बांधकामे सुरू करता आलेली नाहीत. त्यातच कुशल कारागिरांचीही आवश्यकता असते. परंतु कामच नसल्यानेही तेही आपापल्या गावी गेले आहेत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रासाठी हा कसोटीचा काळ असल्याचे एका विकासकाने सांगितले.

विकासकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘रिएल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल’चे (नरेडको) राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरांजन हिरानंदानी म्हणाले, टाळेबंदीमुळे बांधकाम उद्योगाला मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने सवलती जाहीर केल्या असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. ‘कन्फेडरेशन ऑफ रिएल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन’चे (क्रेडाई) अध्यक्ष जक्षय शाह यांनीही, टाळेबंदीमुळे बांधकाम उद्योग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडल्याचे सांगितले. मार्च ते मे हे तीन महिने बांधकाम उद्योगासाठी नेहमीच फायदेशीर ठरतात, परंतु यंदा हा महत्त्वाचा कालावधी वाया गेल्याने गर्तेत सापडला आहे. पावसाळ्याचा काळ हा बांधकाम व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक काळ नसतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टाळेबंदीमुळे बांधकाम उद्योगाला मोठा फटका बसला आहे. केंद्र सरकारने काही सवलती दिल्या असल्या तरी या उद्योगाला चालना देण्यासाठी त्या अपुऱ्या आहेत.

– डॉ. निरांजन हिरानंदानी, अध्यक्ष, नरेडको

टाळेबंदीमुळे बांधकाम उद्योग मोठय़ा आर्थिक अडचणीत सापडला आहे. मार्च ते मे हा कालावधी या उद्योगासाठी फायदेशीर ठरतो, परंतु यंदा तो वाया गेला आहे.

– जक्षय शाह, अध्यक्ष, क्रेडाई

आणखी सवलतींची गरज

दोन महिन्यांच्या टाळेबंदीमुळे काहीच बांधकाम सुरू करता आले नाही. ते सुरू करायचे तर मजूर नाहीत, अशी विकासकांची व्यथा आहे.  निश्चलनीकरणानंतर हळूहळू बांधकाम व्यवसायाचे गाडे रुळावर येत असतानाच करोना टाळेबंदी लागू झाली आणि आमचे सारेच गणित कोलमडले. व्यवसायाचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी तीन ते चार महिने लागतील. मात्र त्यासाठी केंद्र सरकारने आणखी काही सवलती दिल्या तरच आम्हाला बांधकामाचा गाडा पुढे रेटता येईल, असेही विकासकांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 3:39 am

Web Title: lack of skilled workers in the construction sector zws 70
Next Stories
1 विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत अनिश्चितता कायम
2 मार्चच्या तुलनेत दोन हजार मेगावॉटची घट
3 वसतिगृहबाह्य विद्यार्थ्यांना निवासासाठी तालुकास्तरावर रोख रक्कम
Just Now!
X