शीव रुग्णालयात निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहामध्ये पाण्याच्या शुद्धीकरणाची सुविधा कार्यरत नसल्याने डॉक्टरांना अन्य ठिकाणाहून पिण्यासाठी पाणी आणावे लागत असल्याची तक्रार रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेने रुग्णालय प्रशासनाकडे केली आहे.

शीव रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे वसतिगृह पाच मजली असून येथे २११ निवासी डॉक्टर वास्तव्यास आहेत. मात्र या इमारतीच्या एकाही मजल्यावर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. पाणी शुद्धीकरणाची सुविधा बंद पडली असल्याने वसतिगृहातील डॉक्टरांना बाहेरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. गेल्या दोन वर्षांपासून रुग्णालय प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असूनही अद्याप याकडे लक्ष दिलेले नाही, असे शीव रुग्णालयातील मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. हर्षलकुमार महाजन यांनी सांगितले.

रुग्णालयातील रुग्णांना दाखल करण्यात येणाऱ्या वार्ड इमारतीमध्येदेखील पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था उपलब्ध नाही. २५ वार्ड असलेल्या या इमारतीमध्ये रुग्णासोबत असणाऱ्या नातेवाईकांना बाहेरून विकत पाणी घ्यावे लागते किंवा मग अन्य इमारतीमधून आणावे लागते. रुग्णालयाच्या आवारात मोजक्याच ठिकाणी पाणी शुद्धीकरण आणि थंड पाण्याची (कूलर) व्यवस्था उपलब्ध असल्याने डॉक्टरांचे हाल तर होतातच, परंतु रुग्णाच्या नातेवाईकांनाही पाण्यासाठी भटकावे लागते, असेही पुढे डॉ. महाजन यांनी सांगितले.

निवासी डॉक्टरांच्या इमारतीमध्ये काही ठिकाणी पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था बंद पडली असून त्याच्या दुरुस्तीसाठीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. वार्ड इमारतीमध्ये मात्र प्रत्येक वार्डमध्ये पाणी शुद्धीकरणाची व्यवस्था उपलब्ध असल्याचे शीव रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितले.