पिंपात कोंबलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला; पतीवर संशय
भांडुप पश्चिमेला असलेल्या फरीद नगर येथे राहणाऱ्या एका ३० वर्षीय महिलेची हत्या करून तिचा मृतदेह स्टीलच्या पिंपात कोंबल्याचा प्रकार बुधवारी रात्री उघडकीस आला. या महिलेच्या चेहऱ्यावर आणि मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच या महिलेच्या हत्येपासूनच तिचा पती फरार असल्याने त्यानेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी भांडुप पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.
भारती चव्हाण असे या मृत महिलेचे नाव असून ती पती किरण आणि दोन मुले यांच्यासह भांडुप पश्चिमेकडील फरीद नगर येथील कोयल निवास चाळीत राहत होती. किरण हा ऑकेस्ट्रा बारमध्ये ढोलकी वाजवण्याचे काम करतो. बुधवारी संध्याकाळी भारतीची दोन्ही मुले नातेवाईकांसह बाहेर गेली होती. रात्री उशिरा घरी परतल्यावर त्यांना घराचे दार बाहेरून बंद असल्याचे दिसले. दार उघडून ही दोन्ही मुले आत गेली असता त्यांना घरभर रक्ताचा सडा पडलेला दिसला आणि बाजूलाच असलेल्या स्टीलच्या पिंपात भारतीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे त्यांना आढळले. त्यांनी तातडीने शेजाऱ्यांना बोलावल्यानंतर शेजाऱ्यांनी तातडीने भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली.
भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गिजे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांनी पिंपातील भारतीचा मृतदेह ताब्यात घेतला. तिच्या चेहऱ्यावर आणि मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या खुणा आढळल्या. दरम्यान, घराची तपासणी केली असता कोणतीही वस्तू चोरीला गेली नसल्याचेही पोलिसांच्या लक्षात आले. मात्र बुधवार सायंकाळपासून भारतीचा पती किरण बेपत्ता असून त्यानेच हा खून केला असल्याची शक्यता व्यक्त करत भांडुप पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला असून तपास चालू असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिजे यांनी सांगितले.