राज्यात पोलिसांवरील हल्ल्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. मंगळवारी विलेपार्लेमध्ये विनाहेल्मेट गाडी चालवणा-या एका महिलेने महिला वाहतूक पोलिसालाच मारहाण केल्याची घटना घडली आहे.
विलेपार्ले पोलिस ठाण्यातील महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रियंका खोत या महिला संघ महाविद्यालयाजवळ कर्तव्य बजावत होत्या. यादरम्यान त्यांनी विनाहेल्मेट दुचाकीवरुन प्रवास करणा-या बहिण भावाला थांबवले. यानंतर त्या बहिणभावाने पोलिस कॉन्स्टेबल खोत यांच्याशी हुज्जत घातली. या वादाचे पर्यावसन शेवटी हाणामारीत झाले आणि महिलेने खोत यांच्या श्रीमुखात लगावली. याप्रकरणी पोलिसांनी आरती पाटलेकर आणि तिचा भाऊ सुरेश पाटलेकर यांना अटक केली आहे. सुरेश पाटलेकरनेही खोत यांना बघून घेऊ अशी धमकी दिली होती. सध्या पोलीस या घटनेची अधिक तपास करत आहेत.
मुंबईत पोलिसांवर हल्ला झाल्याची ही तिसरी घटना आहे. यापू्र्वी एका दुचाकीस्वाराच्या भावाने केलेल्या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांचा मृत्यू झाला होता. तर कुर्ल्यात नाकाबंदी दरम्यान एका दुचाकीस्वाराने पोलिसांच्या अंगावर गाडी चढवली होती. गेल्या चार वर्षात पोलिसांवरील हल्ल्याचा २०८ घटना घडल्या आहेत. पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये गेल्या तीन वर्षात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५२ जण गंभीर जखमी झालेत.