19 October 2019

News Flash

धक्का लागल्याने सहप्रवासी महिलेला अमानुष मारहाण

लोकल प्रवासात किरकोळ कारणांवरून प्रवाशांमध्ये होणाऱ्या वादाचे रूपांतर अनेकदा हाणामारीत होते.

महिला डब्यातील धक्कादायक प्रकार

केवळ धक्का लागला म्हणून नजराणा पिल्ले या ३५ वर्षीय महिलेला सहप्रवासी महिलेने अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार चर्चगेट ते बोरिवली लोकल प्रवासादरम्यान समोर आला आहे. यात तरुणीच्या हातावर, मानेवर, दंडावर मारहाणीने जबर जखमा झाल्या आहेत. पिल्ले यांनी या मारहाणीविरोधात संबंधित महिलेविरोधात वांद्रे लोहमार्ग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

लोकल प्रवासात किरकोळ कारणांवरून प्रवाशांमध्ये होणाऱ्या वादाचे रूपांतर अनेकदा हाणामारीत होते. दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होत आहे. पश्चिम व मध्य रेल्वेवर वादविवाद, मारहाण झाल्यामुळे गेल्या आठ महिन्यांत ५२ गुन्हे दाखल झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.

सांताक्रूझ येथे राहणाऱ्या नजराणा पिल्ले यांनी १६ सप्टेंबरला रात्री ७.१६ वाजता लोअर परळ स्थानकातील फलाट क्रमांक एकवरून बोरिवलीकडे जाणारी धिमी लोकल पकडली. द्वितीय श्रेणीच्या डब्यातून त्या दरवाजाजवळ उभ्या राहून प्रवास करत होत्या. ही लोकल प्रभादेवी ते दादरदरम्यान आली असता गर्दीमध्ये त्यांच्या शेजारीच उभे असलेल्या एका अनोळखी महिला प्रवाशाला धक्का लागला. मात्र कोणताही विचार न करता त्या महिलेने पिल्ले यांना जोरदार धक्का मारला. त्याला पिल्ले यांनी विरोध करताच संबंधित महिलेने त्यांचा हात मुरगळला व नखाने हातावर ओरबाडले. मारहाण केल्याबद्दल पिल्ले यांनी त्या महिलेला रेल्वे पोलिसांकडे नेण्याची धमकी दिली. त्यावर पुन्हा त्या महिलेने पिल्ले यांच्या डाव्या हाताच्या दंडावर जोरात चावा घेतला.

या वादात पिल्ले यांच्या डाव्या हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी गहाळ झाली आहे. मारहाण करणारी महिला माहीम येताच उतरून पळून गेली. पिल्ले यांनी याविरोधात वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. मात्र ही घटना प्रभादेवी स्थानकाजवळ घडल्याने वांद्रे पोलिसांनी हे प्रकरण मुंबई सेन्ट्रल लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग केले आहे.

मुंबई सेन्ट्रल लोहमार्ग पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी पिल्ले यांनी तक्रार दाखल केल्याचे सांगितले.

आठ महिन्यांत ५२ तक्रारी

पश्चिम व मध्य रेल्वे मार्गावर गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवास करणे जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे लोकल प्रवासात किरकोळ कारणांवरून प्रवाशांमध्ये वाद घडतात. धक्का लागणे, प्रवेशद्वार अडवणे, जागा अडविणे, पादचारी पूल किंवा फलाटावरून चालताना धक्काबुक्की होणे इत्यादी कारणांवरून लोहमार्ग पोलिसांत गुन्हेही दाखल झाले आहेत. गेल्या आठ महिन्यांत ५२ गुन्हे दाखल झाल्याचे सांगण्यात आले. यातील १० गुन्हे पश्चिम रेल्वे मार्गावरील आहेत.

First Published on September 20, 2019 1:34 am

Web Title: ladies women fight akp 94