नोटा दुप्पट करुन देऊ असे सांगत दादरमधील एका एमडी महिला डॉक्टरला तब्बल २७ लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खंडणी विरोधी पथकाने या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
उषा मेहता (५२) या एमडी डॉक्टर असून त्यांचे दादरमध्ये स्वत:चे क्लिनिक आहे. यासंदर्भात खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन अलकनुरे यांनी सांगितले की,  मेहता यांची पवन सिंग याच्याशी ओळख झाली होती. त्याने उत्तर प्रदेशातून आलेले दोन जण गूढ विद्येने पैसे दुप्पट करून देतात, असे  मेहता यांना सांगितले. त्याचे प्रात्यक्षिक बघण्यासाठी  मेहता यांना त्याने लोणावळा येथे नेले. तेथे नोटा दुप्पट करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी पंचवीस हजार रुपये घेतले होते. त्या ठिकाणी अभिषेक  सिंग (३६)आणि सरजी (४२)अशा दोन इमसांनी तीन कागदांच्या तुकडय़ांच्या आधारे हातचलाखी करुन १ हजारांच्या तीन नोटा बनवून दाखविल्या. त्यावर  मेहता यांचा विश्वास बसला. त्यानंतर त्यांनी  मेहता यांना पंचवीस लाख दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवले. त्या गूढ विद्येसाठी नेपाळहून साहित्य आणावे लागेल, असे सांगून  मेहता यांच्याकडून अडीच लाख रुपयेसुद्धा घेतले. नोटा दुप्पट करण्याच्या विधीसाठी  मेहता यांना ऑक्टोबर २०१२ मध्ये लोणावळा येथील डयूक्स हॉटेलमध्ये बोलावले. त्यावेळी मेहता यांनी त्यांना २५ लाख रुपये दिले. परंतु विधीच्या वेळी टेबलाची काच फुटली. त्यामुळे २५ लाखांच्या नोटा जळाल्या, असे कारण देऊन त्यांना फसवले. हे पैसे नंतर परत करू, असे सांगत त्यांनी मेहता यांना परत पाठवले. काही दिवसांनी २५ लाख हवे असतील तर आणखी दोन लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून या तिघांनी धमकवायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर  मेहता यांनी खंडणीविरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सापळा लावला होता. बुधवारी ठरल्याप्रमाणे ही रक्कम घेण्यासाठी तिन्ही आरोपी  मेहता यांच्या दादर येथील क्लिनिकमध्ये आले असता त्यांना अटक केली. हे तिन्ही आरोपी उत्तरप्रदेशातील असून त्यांनी अन्य कुणाला फसविले आहे का त्याचा शोध घेत असल्याचे अलकनुरे यांनी सांगितले.