24 September 2020

News Flash

अमली पदार्थ तस्कर बेबी पाटणकरला अटक

अमली पदार्थाची कुख्यात तस्कर शकुंतला उर्फ बेबी पाटणकरला (५२) अखेर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने पनवेल येथून अटक केली.

| February 8, 2017 11:07 am

अमली पदार्थाची कुख्यात तस्कर शकुंतला उर्फ बेबी पाटणकरला (५२) अखेर मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने पनवेल येथून अटक केली. मागावर  असणाऱ्या मुंबई पोलिसांना तब्बल ४० दिवस गुंगारा देणाऱ्या बेबी पाटणकरच्या अटकेमुळे मुंबईतील अमली पदार्थाच्या तस्करीचे साम्राज्याला हादरा बसला असून अंमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्याची संधी पोलिसांना मिळाली आहे. अमली पदार्थाचा तस्कर आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचा बडतर्फ पोलीस हवालदार धर्मा काळोखे याला अमली पदार्थ पुरविण्याचा तिच्यावर आरोप आहे.
करोडपती ‘ड्रगमाफिया’ बेबी..
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धर्मा काळोखे याला सातारा पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीत अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. काळोखे याच्या पोलीस लॉकर मध्ये १२ किलो एमडी अमली पदार्थ आणि तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे परदेशी चलन समोर आले होते. त्याला अमली पदार्थ पुरविणारी महिला म्हणून बेबी पाटणकरचे नाव पुढे आले होते. या महिलेला पकडण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने जंग जंग पछाडले होते.  पोलिसांची दहा स्वतंत्र पथके कार्यरत असतानादेखील ती पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना बेबी पाटणकर कुडाळहून खाजगी बसने मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली. समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरिष सावंत, पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड, निशिकांत विश्वकार आदींच्या पथकाने या बसचा माग घेत पनवेल येथे सापळा लावून बसमधूनच बेबी पाटणकरला अटक केली. एरवी २५ सिम कार्ड वापरणाऱ्या बेबीकडे सिमकार्ड विरहीत मोबाईल सापडला. तिच्यासोबत असणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. तिला पकडणे आमच्यासाठी सर्वात मोठे आव्हानात्मक काम होते आणि त्यात आम्ही यशस्वी झालो, अशी प्रतिक्रिया सहपोलीस आयुक्त (गुन्हे) अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली.
गेल्या दीड महिन्यांच्या काळात ती सतत पोलिसांना चकवा देत होती. धर्मा काळोखे प्रकरणानंतर पोलिसांनी बेबी पाटणकरचा मुलगा सतीश याला अटक केली होती. तो सातारा पोलिसांच्या ताब्यात आहे. याच दरम्यान, ती दोन वेळा मुंबईतही येऊन गेल्याची चर्चा आहे. या प्रकरणाचा तपास आता गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. बेबीला २८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 3:19 am

Web Title: lady drug mafia shakuntala alias baby patankar arrested
Next Stories
1 करोडपती ‘ड्रगमाफिया’ बेबी..
2 लोकलमधील जादा प्रवाशांबाबत उच्च न्यायालयाचा सवाल
3 चित्रपटात रेल्वेप्रतिमा वापरण्यासाठी रॉयल्टी?
Just Now!
X