मालाड येथील एका तरुणीचे अपहरण करून तिच्यावर लोणावळा येथे बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. बांगूर नगर पोलिसांनी याप्रकरणी तरुणीच्या माजी प्रियकराला अटक केली आहे.
बोरीवलीत राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीचे अंधेरीत राहणाऱ्या मोईद्दीन सिद्दीकी (२५) याच्याशी प्रेमसंबंध होते. मोईद्दीन याचे अंधेरीतील मॉलमध्ये ट्रॅव्हल्स कंपनीचे कार्यालय आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्याचे या तरुणीशी प्रेमसंबंध होते. परंतु मोईद्दीन लग्नास नकार देत असल्याने तिने ते संबंध तोडले होते. मंगळवार २३ एप्रिल रोजी ही तरुणी मालाडच्या एव्हरशाईन नगर येथील एका पबमध्ये बसली असताना मोईद्दीन तिथे आला. तिला मारहाण करत त्याने आपल्या इनोव्हा गाडीत बसवून लोणावळा येथे नेले. लोणावळा येथील एका लॉजमध्ये त्याने खोली घेऊन ठेवली होती. त्या ठिकाणी या तरुणीला त्याने दोन दिवस डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला. गुरूवारी २५ एप्रिल रोजी त्याने या तरुणीला अंधेरी येथील एका रस्त्यावर टाकून दिले. या तरुणीने मग वडिलांच्या मदतीने बोरीवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर शनिवारी हा गुन्हा बांगूर नगर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. बांगूर नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ बागूल यांनी सांगितले की, आरोपी मोईद्दीन याने तरुणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. मोईद्दीनला रविवारी अटक करण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 29, 2013 3:20 am