लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : नवी मुंबई येथील व्यावसायिक सुनील लाहोरिया यांच्या हत्या प्रकरणाचा खटला अन्य न्यायाधीशाकडे वर्ग करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्याच वेळी आठ वर्षांपूर्वी घडलेल्या या हत्येशी संबंधित खटल्याची सुनावणी ४ मार्चपासून दररोज घेऊन खटला जलदगतीने निकाली काढण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.

लाहोरिया यांची १६ फेब्रुवारी २०१३ रोजी त्यांच्या वाशी येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी १४ जणांवर गुन्हा दाखल करत मोक्काही लावला होता.

या हत्येशी संबंधित खटला ठाणे येथील सत्र न्यायालयात सुरू आहे. मात्र सत्र न्यायाधीश आर. आर. वैष्णव हे पक्षपाती असून त्यांनी खटला घाईघाईने निकाली काढत असल्याची भीती व्यक्त करत लाहोरिया यांचा मुलगा संदीप याने हे प्रकरण अन्य न्यायाधीशांकडे वर्ग करण्याची मागणी याचिकेद्वारे उच्च न्यायालयात केली होती.

न्यायालयाचे म्हणणे..

न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने त्याची ही मागणी फेटाळली असून अशा प्रकारे फौजदारी खटला एका न्यायाधीशाकडून दुसऱ्याकडे सहजासहजी वर्ग करता येऊ शकत नाही. त्याचप्रमाणे अशी मागणी करण्यासाठी याचिकाकर्त्यांकडे ठोस पुरावा असणे आवश्यक आहे. न्याय मिळण्यासाठी खटला पारदर्शी पद्धतीने चालवण्यात यावा ही न्यायालय आणि सरकारी वकिलाची मुख्य जबाबदारी असते. कोणतेही न्यायालय हे आरोपी वा पीडित केंद्रित नसते, असे न्यायालयाने नमूद केले.