मागणी नसल्याने लाखो रुपयांचा साठा पडून

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धूलिवंदनावर घातलेल्या र्निबधांमुळे पिचकारी, रंग विक्रेत्यांचा बेरंग झाला आहे. दुकानात पडून असलेला गेल्या वर्षीचा साठा, यंदाही नसलेली मागणी, तीन दिवसांवर होळी आल्यानंतरही ग्राहकांनी फिरविलेली पाठ यांमुळे विक्रेते चिंतेत आहेत.

होळी जवळ येऊ लागताच मस्जिद बंदर येथील घाऊक बाजारपेठ, दादर, माहीममधील हंगामी बाजारपेठा निरनिराळ्या आकाराच्या आकर्षक अशा पिचकारी, विविध रंगांनी बहरून जातात. होळी तीन दिवसांवर आली तरीही या बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.

‘रंग आणि पिचकारी विक्रीस ठेवून आठ दिवस झाले. एकही ग्राहक फिरकलेला नाही. लोकांच्या मनात भीती आहे, शिवाय लहान मुलांचे आरोग्य अधिक महत्त्वाचे असल्याने पालक वर्गाकडून प्रतिसाद नाही’, अशी प्रतिक्रिया दादरमधील ‘गिफ्ट वर्ल्ड’च्या प्रतिनिधींनी दिली. हीच अवस्था रंग विक्रेत्यांची आहे. संसर्गाच्या भीतीने लोकांनी रंगाकडे पाठ फिरवली आहे.

याच दिवसांमध्ये दादर स्थानकाबाहेर आणि माहीम येथील सिटीलाईट बजारात पिचकारी आणि रंगांची मोठी बाजारपेठ भरते. या वर्षी मात्र ती भरलेली नाही. ‘वर्षभरातील इतर सणांना मिळालेला अल्प प्रतिसाद आणि सद्य:स्थिती यामुळे नुकसान होण्यापेक्षा दुकान न थाटलेले बरे अशी विक्रे त्यांची धारणा आहे. मीही दुकान सुरू के ले असले तरी विक्रीबाबत साशंकता आहे,’ अशी खंत माहीम येथील हंगामी विक्रेते सूर्यकांत पोखरे यांनी व्यक्त केली.

नवी मुंबईतील बाजारपेठेत नवी मुंबईसह इतर शहरांतील ग्राहक देखील खरेदीसाठी गर्दी करीत असतात. मात्र यावर्षी निरुत्साह आहे. पिचकारींच्या दरातही १० टक्के वाढ झाली आहे. भारतीय बनावटीच्या पिचकाऱ्या उपलब्ध असून त्यांचे दर ५० ते ८०० रुपयांपर्यंत आहेत. तर नैसर्गिक रंग  ५० ते २५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

चीनमधून आयात 

‘मुंबईत येणाऱ्या विविध प्रकारच्या पिचकाऱ्या या चीनमधून येतात. साधारण डिसेंबपर्यंत पिचकारीचा नवा साठा मागवला जातो. परंतु भारतीय बाजारपेठेतील स्थिती अत्यंत बिकट असल्याने यंदा चीनमधून फारसा साठा आलेला नाही. मुंबईमध्येही ग्राहकांचा प्रतिसाद नसल्याने जानेवारीनंतर ही आयात थांबवली गेली,’ अशी माहिती घाऊक व्यापाऱ्यांनी दिली.

प्लास्टिक पिशव्या सर्रास

घाऊक आणि मोठय़ा दुकानदारांकडे प्लास्टिक पिशव्यांवर असलेली बंदी कटाक्षाने पाळली जात आहे. परंतु किरकोळ दुकानांमध्ये मात्र याची सर्रास विक्री होत आहे. होळीच्या हंगामी वस्तूंमधून प्लास्टिक पिशव्या वगळल्या असल्या तरी दुकानदार मात्र वाणसामान देण्यासाठी वापरात येणाऱ्या पिशव्या रंगपंचमीसाठी विकत आहेत.

गेल्या वर्षी होळीला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने तोच साठा यंदा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. हीच अवस्था किरकोळ विक्रेत्यांची आहे. त्यामुळे नवीन खरेदीसाठी कुणीही धजावत नाही. तरीही आम्ही जानेवारीमध्ये नवीन पिचकाऱ्या आयात केल्या होत्या. परंतु आता होळीवर निर्बंधआल्याने तोही साठा पडून राहणार आहे. दरवर्षी जवळपास १४ ते १५ लाख रुपये किमतीच्या पिचकारींची विक्री करतो. यंदा लाखभर रुपयांचीही विक्री झालेली नाही.   – नरेश दोषी, घाऊक विक्रेते