प्रसाद रावकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून लालबाग सोडून पुढे गेल्यानंतर परळ भाग सुरू होतो. रेल्वे मैदानाजवळच अगदी हाकेच्या अंतरावर पिवळ्या रंगाची पाच मजली ‘म्हाडा’ची इमारत दृष्टीस पडते. ती आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांची आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सरकारची झोप उडविणारी आणि गिरणी कामगारांच्या संपात हिरिरीने उतरलेल्यांची ‘लक्ष्मी कॉटेज’ इमारत. यंत्रणांची झोप उडविणाऱ्या ‘लक्ष्मी कॉटेज’ची ही कहाणी.

Among the vehicles inspected by the RTO 14 percent of the vehicles are polluting
मुंबई : आरटीओने तपासलेल्या वाहनांमध्ये १४ टक्के वाहने प्रदूषणकारी
pimpri chinchwad, drain cleaning work
पिंपरी: नालेसफाई अद्याप कागदावर!
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
Do you know the beginnings of Gmail
जीमेलची सुरुवात आणि एप्रिल फूल कनेक्शन तुम्हाला माहित्येय का?

स्वातंत्र्यपूर्व काळातच मुंबईत औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. मोठय़ा प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध झाल्या. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आणि परराज्यांतून रोजगाराच्या शोधात अनेक तरुण मुंबईत दाखल झाले. या तरुणांच्या निवासाची गरज लक्षात घेऊन अनेक लक्ष्मीपुत्रांनी मुंबईत चाळी बांधल्या. त्यापैकीच एक परळची ‘लक्ष्मी कॉटेज.’

लक्ष्मीदास यांनी १८७५-८०च्या दरम्यान ‘लक्ष्मी कॉटेज’ बांधली. ‘लक्ष्मी कॉटेज’मध्ये एकूण चार इमारती होत्या. रस्त्यालगत तीन मजली, तिच्या मागे समांतर रेषेत दोन दुमजली आडव्या इमारती आणि एका बाजूच्या दुमजली इमारतीला खेटून एक एकमजली इमारत. या चारही चाळी एकमेकींना जोडलेल्या होत्या आणि विशेष म्हणजे ‘लक्ष्मी कॉटेज’ला एकूण दहा जिने होते. त्यामुळे या चाळींमधून कोणत्याही दिशेने बाहेर पडता येत असे. ‘दहा बाय दहा’ फूट आकाराच्या ३०७ खोल्यांमध्ये गिरणी कामगारांची बिऱ्हाडे गुण्यागोविंदाने नांदत होती. कोकण आणि आसपासच्या परिसरातून मुंबईत रोजगारासाठी डेरेदाखल झालेली तरुण मंडळी आपल्या कुटुंबकबिल्यासह ‘लक्ष्मी कॉटेज’मध्ये मुक्कामी होती. सार्वजनिक उत्सवांनी या रहिवाशांमध्ये एकोपा निर्माण केला होता. एखाद्या रहिवाशाच्या घरातील लग्नकार्याच्या वेळी चाळीतील महिला स्वयंपाकासाठी कंबर कसून काम करत. चाळीच्या गॅलरीतच पंगती बसत.

गिरणीत कामाला असले तरी पारतंत्र्यात आणि स्वातंत्र्योत्तर काळात मुंबईत आणि देशात काय चालले आहे यावर ‘लक्ष्मी कॉटेज’मधील रहिवाशांचे बारीक लक्ष असे. चाळीतील रहिवासी कडवे लढवय्ये होते. पारतंत्र्यकाळात या चाळीने अनेक कार्यकर्ते दिले. जिवावर उदार होऊन चाळीतील तरुण स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होत. धाडसी आणि लढवय्या रहिवाशांमुळे ब्रिटिश पोलिसांनीही या चाळीत शिरून कारवाई करण्याचे धाडस कधी दाखवले नाही.

बाबूराव मुंबरकर हा लढवय्या तरुण या चाळीचा रहिवासी. अन्यायाविरुद्ध लढण्याचे व्रतच बाबूरावांनी घेतले होते. त्यांच्या मदतीला ‘लक्ष्मी कॉटेज’मधील रहिवाशी सदैव तत्पर असत. ‘लक्ष्मी कॉटेज’ बाबूरावांची मोठी ताकद होती. स्वातंत्र्य चळवळीत बाबूराव आणि त्यांचे सहकारी अग्रेसर होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ‘लक्ष्मी कॉटेज’ने अक्षरश: दिवाळी साजरी केली.

‘लक्ष्मी कॉटेज’वर समाजवाद्यांचा पगडा होता. त्यामुळे एकेकाळी ‘लक्ष्मी कॉटेज’ समाजवाद्यांचे केंद्र झाले होते. चाळीतील काही रहिवासी काँग्रेसच्या विचारसरणीचे, तर काही कम्युनिस्ट. चळवळींच्या माध्यमातून शासन यंत्रणेला वठणीवर आणणाऱ्या बाबूराव मुंबरकर यांच्यामुळे ‘लक्ष्मी कॉटेज’ला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले होते. राम मनोहर लोहिया, साने गुरुजी, जॉर्ज फर्नाडिस, मधु दंडवते, स. का. पाटील, सुधा साने अशा अनेकांचा ‘लक्ष्मी कॉटेज’मध्ये राबता होता.

महाराष्ट्रापासून मुंबईचा लचका तोडण्याचा घाट केंद्र सरकारने घातला होता. त्याविरोधात मुंबईत संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला. मोर्चे, सभा, आंदोलनांनी मुंबई गर्जू लागली. त्यातच पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर गोळीबार केला. संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या होमकुंडात १०६ जणांनी प्राणाची आहुती दिली. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. या लढय़ात बाबूरावांची ‘लक्ष्मी कॉटेज’ आघाडीवर होती. परळ आणि आसपासच्या भागांत आंदोलन करून बाबूराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लढा अधिक तीव्र केला. चळवळीत सहभागी तरुणांना अटक करण्यासाठी पोलिसांनी आटोकाट प्रयत्न केले. पण तरुणांच्या रक्षणार्थ चाळीतील महिला पुढे सरसावत. त्यामुळे आंदोलनकर्त्यां तरुणांना अटक करणे पोलिसांना शक्यच होत नसे, असं आजही जुने रहिवासी सांगतात.

समाजवादी पार्टीने ‘इंग्रजी हटाव’ची हाक दिली आणि बाबूराव मुंबरकरांनी चळवळ सुरू केली. दुकानांवरील इंग्रजी भाषेतील पाटय़ांना डांबर फासण्याचा सपाटाच त्यांनी लावला. भर पावसाळ्यात माहीममधील अनधिकृत झोपडपट्टीवर पालिकेने बुलडोझर फिरविला आणि अनेकांचे संसार रस्त्यावर आले. या कारवाईदरम्यान तापाने फणफणलेली एक लहान मुलगी बेघर झाली आणि पावसात भिजल्यामुळे तिला प्राण गमवावे लागले. झोपडपट्टीवासीयांनी बाबूराव मुंबरकरांकडे धाव घेतली. बाबूरावांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला आणि पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले. अखेर पावसाळ्यात झोपडय़ांवर कारवाई करायची नाही, असा निर्णय पालिका प्रशासनाला घ्यावा लागला. झोपडपट्टी संघाची स्थापना करून झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभ्या केल्या. त्यामुळे बाबूराव आणि ‘लक्ष्मी कॉटेज’चा या परिसरात दरारा होता.

शिवसेनेचा जन्म झाला आणि ‘लक्ष्मी कॉटेज’वरही भगवा फडकू लागला. ‘लक्ष्मी कॉटेज’ शिवसेनेची ताकद झाली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. सीमा प्रश्न चिघळला आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली. शिवसैनिकांची धरपकड सुरू झाली. यावेळी मात्र पोलिसांनी ‘लक्ष्मी कॉटेज’मध्ये घुसून शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

कापड गिरण्यांमधील कामगारांनी संप पुकारला आणि तो दीर्घकाळ सुरू राहिला. संपामुळे गिरणी कामगार देशोधडीला लागला. ‘लक्ष्मी कॉटेज’मध्ये बहुसंख्य गिरणी कामगार वास्तव्यास होते. रोजगार गेल्यामुळे त्यांची वाताहत झाली. काही गिरणी कामगारांनी घर विकून गावची वाट धरली. तर काहींनी मिळेल ते काम करून कुटुंबाच्या पोटाची खळगी भरली. हालाखीच्या दिवसांतही एकमेकांना साथ देत रहिवासी चाळीत टिकून राहिले.

आज या चाळींचा पुनर्विकास झाला आहे. सार्वजनिक उत्सव ही आजही या चाळींची ताकद आहे. गिरणी कामगारांच्या मुलांनी खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले आणि बडय़ा कंपन्यांत मोठय़ा हुद्दय़ावर विराजमान झाले. तर काहींनी राजकारणात आपला ठसा उमटविला. रहिवाशांमधील एकोपा आजही कायम आहे. त्यामुळे समाजवादी, काँग्रेस, कम्युनिस्ट आणि शिवसेनेचा पगडा असलेली ‘लक्ष्मी कॉटेज’ आजही अभेद्य आहे.

पुनर्विकास

कालौघात ‘लक्ष्मी कॉटेज’मधील चाळी जीर्ण होत गेल्या. चाळींची दुरुस्ती करावी की पुनर्विकास याबाबत रहिवाशांमध्ये मतभेद झाले. शिवसेनेतील स्थानिक नेत्यांनी चाळींची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला, तर काँग्रेसने चाळींचा पुनर्विकास करण्याचे मत मांडले. त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये वादही रंगला. अखेर गुप्त मतदान घेण्यात आले आणि बहुसंख्य रहिवाशांनी पुनर्विकासाच्या पारडय़ात मत टाकले. रहिवाशांनी १९७५ मध्ये चाळ रिकामी केली आणि संक्रमण शिबिराची वाट धरली. पुनर्विकासात चार चाळींच्या जागी पाच मजली तीन इमारती उभ्या राहिल्या आणि रहिवासी आपल्या मूळ ठिकाणच्या नव्या घरात वास्तव्यास आले. नव्या इमारतींचे नाव काय ठेवावे असा प्रश्न निर्माण झाला. पूर्वीचेच नाव कायम ठेवण्याचा आग्रह रहिवाशांनी धरला आणि नव्या चाळी ‘लक्ष्मी कॉटेज’ नावानेच ओळखल्या जाऊ लागल्या.