करोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने उत्सव करण्याच्या राज्य सरकारच्या आवाहनाला चहूबाजूंनी सकारात्मक प्रतिसाद येत असतानाच सर्वाचेच लक्ष लागलेल्या ‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळा’ने यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना करणार नसल्याचे जाहीर केले आहे.  त्याऐवजी गणेशोत्सवाचे ११ दिवस ‘आरोग्योत्सव’ साजरा केला जाईल असेही सांगण्यात आले.

करोनाचा वाढता संसर्ग आणि उत्सवातील संभाव्य धोके लक्षात घेत देशभरातील उत्सवांमध्ये बदल घडू लागले आहेत. राज्यात मोठय़ा प्रमाणात होणारा दहीहंडीचा उत्सवदेखील यंदा रद्द करण्यात आला. अनेक गणेशोत्सव मंडळांनी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देत मूर्तीची उंची ३ ते ४ फुटांपर्यंत कमी केली.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ‘लालबाग राजा’ यंदा विराजमान होणार नसल्याची  घोषणा मंडळाने बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केली. त्याऐवजी ११ दिवस रक्तदान, रक्तद्रव दान आदी आरोग्यविषयक उपक्रम राबवून गणेशोत्सवाऐवजी ‘आरोग्योत्सव’ साजरा करण्याचा मंडळाचा मानस आहे. गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाला होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. ‘यंदाचे हे उत्सवाचे ८७वे वर्ष असून करोनाचे वाढते प्रस्थ ही चिंतेची बाब असल्याने परिस्थिती उत्सवपूरक नाही. त्यामुळे मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याऐवजी आरोग्योत्सव करण्याचे मंडळाने योजले आहे,’ असे मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी सांगितले. यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २५ लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षेखातर स्वत:चा जीव धोक्यात घालून करोनाशी लढा देणाऱ्या शहीद पोलिसांच्या आणि गलवान खोऱ्यात वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार आहे.

परंपरा खंडित करु नका- समितीचे आवाहन

मंडळाने घेतलेला आरोग्योत्सवाचा निर्णय स्तुत्य असला तरी ८६ वर्षांची उत्सवाची परंपरा खंडित करू नये. शासनाने आखून दिलेले नियम आणि ४ फुटांची उंची याचे पालन करत मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आणि उत्सव साजरा करावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळाला केले आहे.