गेल्या काही काळापासूनच गणेशोत्सवाच्या तयारीसाठी अनेकांची लगबग सुरु होती. जैय्यत तयारीच्या बळावर मोठ्या उत्साहात या सोहळ्याला सुरुवात झाली आणि बघता बघता अनंत चतुर्दशीचा दिवस उजाडला. आपल्या भक्तांचा पाहुणचार घेतल्यानंतर आता बाप्पा वर्षभरासाठी सर्वांचाच निरोप घेणार आहेत. अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विसर्जनासाठी खास तयारी केली आहे. प्रसिद्ध आणि मोठ्या गणेशमूर्त्यांचे सुरळीत विसर्जन पार पाडण्यासाठी प्रशासन आणि कार्यकर्तेही सज्ज आहेत. विविध तंत्रांचा वापर करत विसर्जन मिरवणुकांवर नजर असणार आहे. प्रगत तंत्रज्ञानाचे वाढते प्रमाण लक्षात घेता विसर्जनासाठी बाप्पाही हायटेक होणार आहेत.

पाहा: लालबागचा राजा थेट प्रक्षेपण

मुंबईतील मानाच्या लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यासाठी या वर्षी एका नवीन तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. अनेक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी ‘मरीन टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात येणार आहे. बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न पार पडण्यासाठी एक विशेष तराफाही तयार करण्यात आला आहे. ‘लिफ्ट’ पद्धतीचा हा खास तराफा ‘शार्प शिपयार्ड’ या कंपनीने तयार केला आहे. त्यांमुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.