30 March 2020

News Flash

लालबागच्या राजाला १७ लाखांचे आगाऊ बिल

उत्सव काळात अग्निशमन सुविधा पुरवण्यासाठीच्या शुल्कात सहापट वाढ

(संग्रहित छायाचित्र)

उत्सव काळात अग्निशमन सुविधा पुरवण्यासाठीच्या शुल्कात सहापट वाढ

मुंबई : आग, धक्काबुक्कीसारखी दुर्घटना टाळण्याकरिता अग्निशमन दलातर्फे ‘लालबागच्या राजा’च्या मंडळाला देण्यात येणाऱ्या सेवांसाठीचे शुल्क तब्बल सहा पटीने वाढविण्यात आले आहे. अग्निशमन दलाने यंदा १७ लाखाचे आगाऊ बिल मंडळाला पाठवले आहे. दोन वर्षांपूर्वी अडीच ते तीन लाख रुपये असलेले हे शुल्क आता १७ लाखांवर गेले आहे.

लालबागच्या राजा मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सव काळात प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे या गर्दीत एखादी दुर्घटना घडू नये म्हणून अग्निशामक दलाची गाडी चोवीस तास अकरा दिवस मंडळाच्या परिसरात उभी असते. त्यावर जवानही तैनात असतात. या सुविधेसाठी अग्निशामक दलाने लालबागचा राजा मंडळाकडे १७ लाखांची मागणी केली आहे. एवढे मोठे बिल आल्यामुळे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष आहे. गेल्या वर्षी देखील अग्निशामक दलामार्फत एवढे मोठे बिल पाठवण्यात आले होते. मात्र त्यानंतर स्थापत्य समितीमध्ये नगरसेवक सचिन पडवळ आणि श्रद्धा जाधव यांनी विरोध केल्यानंतर ही रक्कम तीन लाखांवर करण्यात आली होती.

सन २०१६ मध्ये याच सुविधेसाठी अडीच लाखांचे बिल देण्यात आले होते. मग दोन वर्षांत एवढय़ा मोठय़ा रकमेचे बिल कसे काय असा सवाल स्थानिक नगरसेवक सचिन पडवळ यांनी केला आहे.

ज्या ठिकाणी मोठय़ा जत्रा भरतात किंवा सार्वजनिक कार्यक्रम होतात तिथे अग्निसुरक्षा पुरवली जाते. मग लालबागच्या राजा मंडळातर्फे रीतसर परवानगी घेतलेली असताना तसेच खड्डे भरण्यासाठीही पैसे वसूल केले जातात. मग नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पालिकेची, पण नाही का असा सवाल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मंडळाने हे बिल न भरण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

२ ते १२ सप्टेंबर या कालावधीत साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी एक अग्निशमन बंब कर्मचाऱ्यांसह सज्ज ठेवण्याकरिता हे बिल आकारण्यात आले आहे. पालिकेच्या प्रचलित धोरणानुसार ठरवून देण्यात आलेल्या शुल्कानुसार ही रक्कम आकारण्यात आल्याचे दलाचे म्हणणे आहे. पहिल्या तीन तासांकरिता १०,६४० रुपये तर त्या पुढील प्रत्येक तासासाठी ३,६०० रुपये लावण्यात आले आहेत. एकूण २६४ तासांकरीता ९ लाख ५० हजार २४० रुपयांचे बिल आकारण्यात आले आहे. त्यात जीएसटी व कर्मचाऱ्यांचा भत्ता मिळून १७ लाख २० हजार ९२३ रुपये आकारण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2019 3:54 am

Web Title: lalbaugcha raja mandal get advance bill of rs 17 lakh from mumbai fire brigade zws 70
Next Stories
1 बेकायदा मंडपांचे पेव
2 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात
3 मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवात सुकर
Just Now!
X