लालबागच्या राजाच्या विसर्जनाच्यावेळी गिरगाव चौपाटीच्या सुमद्रात एक नाव पलटी झाली होती. या नावेतील सात ते आठ जण समुद्रात पडल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ त्यांना वाचवले पण साईश मर्दे हा पाच वर्षांचा मुलगा सापडला नव्हता. ही दुर्घटना घडली त्या दिवसापासून नौदल आणि तटरक्षक दल हेलिकॉप्टरच्या मदतीने साईशचा शोध घेत होते. अखेर सहा दिवसांनी राजभवनला लागून असलेल्या समुद्रात साईशचा मृतदेह सापडला.

लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी तराफ्यासह अनेक नौका खोल समुद्रात गेल्या होत्या. त्यातील राजधानी नावाची नौका विसर्जन सुरु असताना पलटी झाली होती. अनंतचर्तुदशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी सकाळी लालबागच्या राजाचे विसर्जन झाले. पालघर येथे राहाणारा साईश लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी आई-वडिल आणि बहिणीसह मामाकडे आला होता.

तो मामाच्या बोटीतून विसर्जन पाहण्यासाठी खोल समुद्रात गेला होता. विसर्जन सुरु असताना शेजारच्या बोटीची ठोकर लागून राजधानी नौका पलटली. त्या नौकेतील साईशसह सात ते आठ जण समुद्रात पडले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना वाचवले पण साईशचा शोध लागत नव्हता. अखेर साईशचा मृतदेह आज सकाळी सापडला. पोलिसांनी साईशचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांकडे सोपवला आहे.