नेरुळ येथील अनिवासी भारतीय संकुलात राहणाऱ्या संध्या सिंग (50) यांचा अखेर आज जवळच्या खाडी तलावात मृतदेह सापडला. त्यामुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे. सिंग मागील दीड माहिनापासून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांचे बंधू संगीतकार ललीत पंडीत यांनी केली होती. केंद्रीय सीमाशुल्क विभागाचे आयुक्त (मध्य प्रदेश) जयप्रकाश सिंग यांच्या त्या पत्नी होत्या. सिंग यांच्या मृतदेहाचे अवशेष छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले असून त्यांनी गळ्यात घातलेल्या रुद्राक्षवरुन त्यांची ओळख पटली आहे. सिंग यांचा खून की आत्महत्या या संभ्रमात पोलिस आहेत. अधिक तपासणीसाठी ते अवशेष प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
पन्नास वर्षीय सिंग १३ डिसेंबर रोजी बेपत्ता झाल्याची नोंद एनआरआय पोलिस ठाण्यात त्यांचे बंधू संगीतकार ललीत पंडीत यांनी केली होती. सिनेअभिनेत्री सुलक्षणा पंडीत, विजया पंडीत यांची भगिनी असलेल्या सिंग यांच्या तपासासाठी पोलिसांवर विविध स्तरातून दाबाव येत होता. पोलिस तेव्हापासून सिंग यांचा कसोशीने शोध घेत होते पण पोलिसांना त्यात यश आले नाही. आज सकाळी दिल्ली पब्लिक स्कुलच्या मागील बाजूस असलेल्या खाडी तलावात शरीराचे काही भाग तंरगत असल्याची माहिती एका पक्षीप्रेमी छायाचित्रकाराने पोलिसांना दिली. अवेशष तलावातून बाहेर काढल्यानंतर दाताला बसवलेली कॅप, गळ्यातील रुद्राक्षाची माळ, काही सोने यावरुन पंडीत यांनी हा मृतदेह बहिणीचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी मात्र तसे जाहीर न करता ते अवशेष अधिक तापसासाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत. गुन्हे अन्वेषन विभागाची चक्रे जोरात फिरु लागली आहेत.