पाठय़पुस्तकांची कालांतराने होणारी ‘पानगळ’ थांबविण्याबरोबरच त्याचे मुखपृष्ठ आकर्षक लॅमिनेशन अथवा वेष्टन घालून टिकावू करणारी अनेक नवी तंत्रे शालेय वस्तूंच्या (स्टेशनरी) बाजारात येऊ लागली आहेत. पाठय़पुस्तकांना वेष्टन घालण्याच्या कामातून सुटका झाल्याने पालकांचीही याला पसंती मिळते आहे.

जून उजाडला की मुलांच्या पाठय़पुस्तकांना आणि वह्यंना खाकी रंगाच्या कागदाचे कव्हर घालून त्यांना साज चढविण्याचे एक काम पालकांना इतर शालेय वस्तूंच्या खरेदीसोबत हमखास करावे लागते. मधल्या काळात पावसाळ्यात पुस्तके भिजू नये किंवा त्याचे मुखपृष्ठ सुरक्षित राहावे म्हणून प्लॅस्टिकची तयार वेष्टने बाजारात आली. पुस्तक त्यात अडकवले की काम फत्ते. अनेकदा पुस्तकाला खाकी वेष्टन घालून त्याला प्लॅस्टिकचे तयार कव्हर घातले जात असे. गेली अनेक वर्षे पाठपुस्तकांना नवा साज चढविणारे किंवा त्यांना टिकावू बनविणारे हे तंत्र यापुढे गेले नव्हते. मात्र आता कागदी वेस्टनची जागा प्लॅस्टिकच्या खाकी रंगाच्या कागदाने घेतली आहे. तर पुस्तकांची पानगळ होऊ नये आणि ती वर्षभर टिकावी यासाठी बायडिंग, लॅमिनेशनची अनेक नवनवीन तंत्रे बाजारात येऊ लागली आहेत.

पुस्तकाच्या मापाप्रमाणे कापून योग्य रितीने कव्हर घालणे हे काम फार कौशल्याचे असते. एवढे करुनही पुस्तके वर्षभर टिकतील याची शाश्वती नसते. त्यामुळे बाजारातून आणलेली नवी कोरी पुस्तके वर्षांच्या शेवटी अशा स्थितीत असतात, की ऐन परीक्षांच्या काळात मुलांना नीटपणे वाचता येत नाहीत. अनेकदा शालेय पुस्तक वर्षांच्या शेवटी बाजारात उपलब्ध नसल्यामुळे बरेच पालक सुरुवातीलाच पुस्तकांच्या दोन प्रतीही विकत घेतात. परंतु, बायडिंगच्या नव्या तंत्रामुळे पालकांची पुस्तकांविषयीची ही चिंता दूर झाली आहे. दोऱ्याने शिवणे, चिकटविणे आणि स्टेपल करणे अशा प्रकारांमध्ये बायडिंग केले जाते. त्याचा दर पुस्तकानुसार १० ते ७० रुपये इतका असतो.

या शिवाय पुस्तकांच्या मापाची प्लॅस्टिक आणि खाकी कागदाची तयार वेष्टनेही बाजारात उपलब्ध आहेत. अगदी ४ रुपयांपासून ते १० रुपयांपर्यत पुस्तकांच्या मापानुसार ती मिळतात. पुस्तकांना तयार कव्हर घालणे तुलनेने सोपे असते. त्यामुळे पालक त्याला पसंती देतात. पुस्तके फाटू नयेत यासाठी लॅमिनेशन करण्याचाही नवा ट्रेण्डही बाजारात आला आहे. पुस्तकाच्या मापानुसार १० रुपयांपासून ते ३० रुपयांपर्यत हे लॅमिनेशन करून मिळते. लॅमिनेशन आणि बाईडिंग करताना पुस्तकावर नावाचे लेबलिंगही करून दिले जाते. काही ठिकाणी गेल्या वर्षीच्या वह्य़ांची कोरी पाने एकत्र करून बाईंडिंग करून, नवीन वह्य़ाही तयार करून दिल्या जात आहेत.

लॅमिनेशन, बाईडिंगला पसंती

पुस्तके फाटू नयेत यासाठी पालक नेहमीच काय करता येईल असे आम्हाला विचारत असतात. यंदा पुस्तके बाईिडग करुन त्याला लॅमिनेशन करुन घेण्याकडे पालकांचा जास्त कल आहे. लॅमिनेशनमुळे पुस्तकाचे कव्हर फाटत नाही. शाळा सुरु होण्यापूर्वी आमच्याकडे पुस्तकांचा ढीग लागला होता. अजूनही खूप पालक लॅमिनेशनसाठी येत आहेत. नुसते कव्हर घालून पुस्तके फार काळ टिकत नाहीत त्यामुळे स्टेपलिंग करुन बाईडिंग करण्यातरिताही पालक मोठय़ा संख्येने येत आहेत. त्यामुळे पुस्तके मुलांनी कशाही रितीने हाताळली तरी पाने निघत नाहीत.  प्रल्हाद सिंह, शक्ती बुक डेपो, बोरीवली

  • पुस्तके दोऱ्याने शिवून ती बांधण्याचे बायडिंगचे तंत्रही आता जुने झाले आहे. कारण कागदाने पुस्तके बांधल्यानंतर मजकूराच्या डाव्या बाजूचा समास बांधणीत निघून जातो. त्यामुळे मजूकर नीट वाचता येत नाही. परंतु, आता विशिष्ट स्टॅपलरने पुस्तके बांधली जातात. त्यानंतर त्याचे मुखपृष्ठही लॅमिनेशन करून मिळते.
  • अवघ्या ५० ते ७० रुपयांत या तंत्राने पुस्तक वर्षभर टिकेल इतके सुरक्षित केले जाते.