जम्मू-काश्मीरमधील एलओसीवरील पूँछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टर भागात पाकिस्तानी रेंजर्सने केलेल्या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने याबाबत माहिती दिली आहे.


लान्स नायक अॅन्टोनी सेबस्टिअन के. एम. (वय ३४, मनकुन्नम, केरळ) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. अॅन्टोनी यांच्या मागे त्यांची वीरपत्नी आहे. सोमवारी संध्याकाळी ५.१५ मिनिटांनी पाकिस्तानी सैन्याकडून कृष्णा घाटी भागात शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबार करण्यात आला. यामध्ये जवान अॅन्टोनी हे गंभीररित्या जखमी झाले. तर हवालदार मरी मुथ्थू डी. हे देखील यात गंभीररित्या जखमी झाले. यानंतर या दोघांना तत्काळ प्रथमोपचार आणि वैद्यकीय मदत देत पूँछच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये हालवण्यात आले. मात्र, अॅन्टोनी यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, पाकिस्तानाच्या या हल्ल्याला भारतीय सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, रविवारी नाशिकचे जवान नायक केशव सोमगिर गोसावी (वय २९) हे जम्मू-काश्मीरमधील नौशेरा भागातील चकमकीदरम्यान शहीद झाले होते. त्यापूर्वी शनिवारी सुंदरबनी भागात रायफलमन वरुन कत्ताल हे सीमेपलिकडील गोळीबारात शहीद झाले. शुक्रवारी लष्कराच्या एका पोर्टरचा अखूनर भागात चकमकीदरम्यान मृत्यू झाला.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामध्य भारतीय सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वारंवार पाकिस्तानला याबाबत समज देऊनही शस्त्रसंधीच्या घटना वारंवार घडत असल्याने पाकिस्तानला पुन्हा सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे उत्तर देण्याची गरज असल्याचे नागिरकांचे म्हणणे आहे.