प्रख्यात हृदय शल्यविशारद डॉ. नीतू मांडके यांना ३० वर्षांसाठी वार्षिक एक रुपया भुईभाडय़ाने १२ हजार चौरस मीटरचा भूखंड वितरीत करताना या भूखंडाचा वापर फक्त रुग्णालयाच्या बांधकामासाठी करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु कोकीळाबेन अंबानी रुग्णालयाने या अटींचे सर्रास उल्लंघन केले असून त्याची साधी नोंदही उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. मालकी हक्क हस्तांतरण करताना शासनाची परवानगी घेतली नाही, इतकेच नोटिशीत नमूद करून २००९ मधील रेडी रेकनरनुसार १७४ कोटी रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे.
७ जानेवारी १९९८ रोजी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी अटी व शर्तीच्या अधीन राहून हा भूखंड डॉ. मांडके यांच्या ‘मालती वसंत हार्ट ट्रस्ट’ला हृदयरोग संशोधन केंद्र आणि रुग्णालय बांधण्यासाठी वितरीत केला. मात्र पहिल्या मजल्यावर डॉ. मांडके यांच्या नावे असलेले सभागृह वगळता रुग्णालयात कुठेही त्यांचे नामोनिशाण नाही. सर्वत्र अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीचेच वर्चस्व दिसून येते. रुग्णसेवेच्या नावाखाली उपलब्ध करून देण्यात आलेल्या पंचतारांकित सुविधा म्हणजे शासनाच्या आदेशातील सर्व प्रमुख अटींचे उल्लंघन असल्याचे दिसून येते. याची नोंद महालेखापालांनी २०११-१२ च्या अहवालात केली असली तरी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय याबाबत ब्रही काढायला तयार नाही. २००७ आणि २०१० मध्ये ट्रस्टवर नोटिसा बजावण्यात आल्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी संजय देशमुख यांनी स्पष्ट केले असले तरी या नोटिसा फक्त मालकी हक्क हस्तांतरणापोटी १७४ कोटी भरण्यासाठी असल्याचे कळते.   
डॉक्टर व परिचारिका यांची निवासस्थाने वगळता भूखंडाचा वापर फक्त रुग्णालय इमारतीसाठीच करावा, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही रुग्णालयाने गिफ्ट शॉप, स्पा, ब्युटी सलून, कनव्हेन्शन सेंटर, बिझिनेस सेंटर, तयार असलेली कॉर्पोरेट कार्यालये आदींसाठी वापर केल्याचे दिसून येते. परंतु जिल्हाधिकारी कार्यालयाला ते दिसले नसल्याचा खोचक शेराही महालेखापालांच्या अहवालात आढळतो.