नवी मुंबईतील नियोजित विमानतळाच्या भूसंपादनावरून घोळ सुरू असतानाच पुण्याजवळ चाकण येथे उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित विमानतळाच्या जागेला विरोध झाल्याने पर्यायी जागा निवडण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. मात्र नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या जागेतही विमानतळ उभारण्यास स्थानिकांचा सक्त विरोध आहे.  
चाकण विमानतळाच्या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. चाकण येथील प्रस्तावित विमानतळाच्या जागेस विरोध सुरू झाला आहे. नियोजित जागेतच विशेष आर्थिक क्षेत्र उभारण्यात येत असून, विमानतळ उभारण्याकरिता सुमारे ७०० कुंटुंबियांना स्थलांतरित करावे लागेल. परिणामी विमानतळ प्राधिकरणाने निश्चित केलेल्या जागेतून विमानतळ बाजूच्या जागेत उभारावा असा प्रस्ताव पुढे आला. यासाठी राज्य शासन आणि विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी महिनाभरात सर्वेक्षण करून जागेबाबत अहवाल सादर करतील, असे सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
पुणे-नाशिक मार्गावरील नव्याने प्रस्तावित असलेल्या जागेत उद्योगपती बाबा कल्याणी यांच्या ताब्यात असलेली जागा संपादित करावी लागेल. बैठकीस कल्याणी यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी विशेष आर्थिक क्षेत्राकरिता संपादित केलेली जागा वगळता बाकीची काही जमीन देण्याची तयारी दर्शविल्याचे पाटील यांनी सांगितले.
मात्र नव्याने प्रस्तावित असलेल्या जागेत विमानतळ उभारण्यास नागरिकांचा विरोध आहे. कारण त्या जागेत विमानतळ उभारल्यास नागरिकांना स्थलांतरित करावे लागेल. नव्याने प्रस्तावित केलेल्या गावांतील नागरिकांनी स्थानिक आमदार आणि विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे विरोध बोलून दाखविला.
नवी मुंबई विमानतळाच्या भूसंपादनाकरिता एकरी २०कोटींची मागणी अव्यवहार्य असल्याचे शासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आता चाकण विमानतळाच्या जागेवरूनही वाद उभा राहिला आहे. यामुळे नवी मुंबई व चाकण हे दोन्ही प्रस्तावित विमानतळ वादात अडकण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील विमातळात दोन धावपट्टय़ा उभारण्यात येणार आहेत. यामुळे चाकणमध्ये एकच धावपट्टी उभारावी, अशी सूचना पुढे आली आहे. कारण दोन धावपट्टय़ा उभारण्याकरिता जास्त जागेची आवश्यकता भासेल. पुणे विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ३० लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. पुण्यातील विमानतळ हा हवाई दलाच्या मालकीचा असून, त्यावरून नागरी वाहतूक जास्त काळ चालू ठेवता येणार नाही, असे हवाई दलाने यापूर्वीच कळविले आहे.