वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे काम शेतकरी हिताचे आहे. या संस्थेला शासनाने जालना येथे भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून दिली आहे, मालकी हक्काने नाही, असे स्पष्टीकरण अल्पसंख्याक मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळातही २०१७ मध्ये जमीन देण्याच्या प्रस्तावावर प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे भाजपने राजकारण करू नये, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

संस्थेला जालना येथे ५१ हेक्टर जागा नाममात्र दराने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संस्थेचे अध्यक्ष असून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते संस्थेशी निगडित आहेत. त्यामुळे मलिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व राज्य सरकारची भूमिका मांडली. संस्थेला अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ते जमिनीच्या रूपाने असून भाडय़ाने देणे चुकीचे नाही, असे मलिक यांनी सांगितले.

ही संस्था शेतकऱ्यांसाठी कार्यरत असून शरद पवार हे केंद्रीय कृषीमंत्री असताना संस्था उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. अनेक आमदार, मंत्री संस्थेचे विश्वस्त असून त्यात राधाकृष्ण विखे-पाटील, हर्षवर्धन पाटील अशा काही भाजप नेत्यांचाही समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संस्थेला भेट दिली असून येथे अनेक आंतरराष्ट्रीय परिषदा पार पडल्या आहेत व जागतिक पातळीवरील नामांकित व्यक्ती संस्थेत येत असतात, अशी माहिती मलिक यांनी दिली.