आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येत असल्याच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील जागेचे व घरांचे दर गगनाला भिडले असतानाच प्रत्यक्ष विमानतळ परिसरातच बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. राज्य सरकारने प्रभावित क्षेत्र म्हणून जाहीर केलेल्या रायगड जिल्ह्य़ातील नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुएन्स नोटिफाइड एरिया (नयना) क्षेत्रात भूखंड माफियांनी ग्रामस्थांकडून जमिनी विकत घेण्याचा सपाटा चालवला असून त्यावर रातोरात बेकायदा इमारती उभ्या राहत आहेत. आजघडीला या संपूर्ण परिसरात पाच हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे दिसून आले आहे.
पनवेल तालुक्यात उभारण्यात येत असलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवतालचा २५ किमीचा परिसर नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र अर्थात ‘नयना’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या क्षेत्रात सहा तालुक्यांतील २७० गावांचा समावेश आहे. राज्य शासनाने नुकतीच या क्षेत्रासाठी सिडकोची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे येथील मूळ जमीनमालकांना आपल्या जमिनी सिडको संपादित करणार, अशी भीती वाटू लागली आहे. त्याचाच फायदा भूखंड माफियांनी उचलला असून येथील दलालांच्या मदतीने जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यावर रातोरात बेकायदा इमारती उभारण्यात येत आहेत. सुमारे पाच हजार बांधकामे या क्षेत्रात उभी राहत असल्याची माहिती आहे. याठिकाणी अधिकृत इमारतीमधील घरांना १६ लाख रुपयांचा दर असताना अनधिकृत इमारतींमध्ये पाच ते सहा लाख रुपयांना घरे विकण्यात येत आहेत.
या क्षेत्राचा विकास आराखडा बनवण्याचे तसेच येथील बांधकामप्रकल्पांना परवानगी देण्याचे सर्व अधिकार सिडकोला देण्यात आले आहेत. मात्र, सिडकोला खबरही न लागू देता येथे भूखंडांचे हस्तांतरण केले जात आहे. त्यामुळे सिडकोने या परिसराचे नव्याने सर्वेक्षण सुरू केले आहे. त्यासाठी ‘गुगल अर्थ’चा आधार घेतला जात आहे. मात्र, अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी सिडकोकडे याठिकाणी सक्षम यंत्रणा नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

काय आहे नयना?
*    नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून २५ किमीच्या परीघातील परिसर राज्य शासनाने प्रभावित क्षेत्र (नयना) म्हणून जाहिर केले आहे.
*    हा संपूर्ण परिसर ६०० चौरस किमी क्षेत्रफळाचा आहे.
*    पूर्वेकडे माथेरान डोंगरापासून पश्चिमेस पेण पालिकेपर्यंत ही हद्द विस्तारली असून यात खोपोली, खालापूर पालिकेच्या हद्दीपर्यंतच्या भागांचा समावेश आहे.