News Flash

इमारत उभारणीसाठी परवानग्या दिल्यानंतर भूखंड घोटाळा कसा?

नियमानुसार खोदकामाची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली.

कांदिवलीतील झोपुवासीयांचा सवाल

कांदिवली येथील हनुमाननगर या तीन ‘के’अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेशेजारी असलेल्या १० एकर भूखंडावर पुनर्वसनाच्या इमारतींच्या उभारणीसाठी संबंधित यंत्रणांनी रीतसर परवानग्या दिल्यानंतर भूखंड घोटाळा कसा होऊ शकतो, असा सवाल या योजनेतील झोपुवासीयांनी विचारला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयालाही या इमारत उभारणीची कल्पना होती, असा दावाही या झोपुवासीयांनी केला आहे.

कांदिवलीतील शासकीय भूखंडाचा घोटाळा झाल्यामुळे सुमारे १० एकर भूखंड परत घेण्याचे आदेश माजी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी दिले.

या आदेशामुळे संबंधित झोपुवासीयांमध्ये खळबळ माजली. इमारत उभारणीसाठी जे खोदकाम करावे लागते त्यासाठी शासनाकडून आणि पर्यायाने जिल्हाधिकाऱ्यांकडून शुल्क आकारले जाते.

नियमानुसार खोदकामाची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून घेण्यात आली. इतकेच नव्हे तर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानेही आवश्यक त्या सर्व परवानग्या दिल्या. तब्बल २७ परवानग्या आतापर्यंत विकासकाने घेतल्या. त्या वेळी कोणी आक्षेप नोंदविला नाही. मग आताच कसा या भूखंडाचा घोटाळा झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आला, असा सवालही या झोपुवासीयांनी विचारला आहे.

१७ हजार झोपुवासीयांच्या पुनर्वसनासाठी तब्बल ६५ ते ७० गृहनिर्माण संस्था एकत्र आल्या असून त्यांनी सेवा संस्था स्थापन केली आहे. सर्व गृहनिर्माण संस्थांनी वैयक्तिकरीत्या पत्रे सादर करून या पुनर्विकासात सामील झाले होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून प्रचार सुरू झाला आणि अचानक भूखंड परत घेण्याचा आदेश आला.

शासकीय सर्वेक्षण सुरू असतानाही ते बंद पाडण्यात आले. विशेष वसाहत निर्माण करण्यासाठी मोकळा शासकीय भूखंड देण्यात आला असतानाही तो विकासकाने बळकावला असा चुकीचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

आम्ही माळ्याचे बांधकाम केले तर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी तातडीने बांधकाम पाडण्यासाठी येतात आणि चिरीमिरी घेऊन निघून जातात. गेल्या चार वर्षांत जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकारी येऊन गेले. त्यापैकी कुणालाही भूखंड बळकावल्याचे दिसून आले नाही, याकडेही या झोपुवासीयांनी लक्ष वेधले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2016 2:02 am

Web Title: land scam in kandivali
Next Stories
1 मुंबई जलमय झाल्यास जबाबदारी आयुक्तांची
2 म्हाडाचे घर देण्याच्या नावाखाली अनेकांची फसवणूक
3 नाटय़ परिषदेच्या नाशिक शाखेचे पुरस्कार जाहीर
Just Now!
X