News Flash

‘बुलेट’ची जागा मेट्रोला?

कारशेडसाठी वांद्रे-कुर्ला संकुलातील जमिनीची चाचपणी

(संग्रहित छायाचित्र)

कांजूरमार्गमध्ये मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिके मुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी सुरू केली आहे. मेट्रो कारशेडला आडकाठी आणली जात असेल तर बुलेट ट्रेन प्रकल्पाला अजिबात सहकार्य करणार नाही, असा संदेश ठाकरे सरकारने याद्वारे केंद्राला दिल्याचे मानले जाते.

कांजूरमार्गमध्ये कारशेड उभारण्याच्या कामाला उच्च न्यायालयाने बुधवारी स्थगिती दिली. ‘आरे’मध्ये कारशेड उभारायचे नाही, हे महाविकास आघाडी सरकारने आधीच निश्चित के ल्याने पर्यायी जागेचा विचार सुरू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी एकनाथ शिंदे, अनिल परब, आदित्य ठाकरे या मंत्र्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यातून वांद्रे-कुर्ला संकुलात कारशेड उभारण्याच्या पर्यायाची चाचपणी करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कांजूरमार्ग येथे कारशेड उभारण्यास न्यायालयाने स्थगिती दिली असून, न्यायालयीन सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. मेट्रोचा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असल्यानेच अन्य जागेच्या पर्यायांचा विचार सुरू झाल्याचे सरकारमधील उच्चपदस्थांकडून सांगण्यात आले. वांद्रे-कुर्ला संकुलातील मोकळे मैदान किंवा गोरेगावमधील जागेच्या पर्यायावर चर्चा झाली. यापैकी वांद्रे-कुर्ला संकुलातील जागा अधिक योग्य असल्याने त्या जागेची चाचपणी करण्यात येईल. कांजूरमार्ग येथील जागा घाईघाईत हस्तांतरित करण्याचा निर्णय अंगलट आल्याने सरकारने आता कायदेशीर बाबींचा अभ्यास केल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत.

वांद्रे-कुर्ला संकुलातील जागा ही मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच राज्य सरकारच्या मालकीची असल्याने या जागेवर कारशेड उभारण्यात कायदेशीर अडथळे येणार नाहीत, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. फक्त बुलेट ट्रेन प्रकल्पाला जागा देण्याच्या निर्णयात बदल करावा लागेल. सिप्झ ते वांद्रे-कुर्ला संकुलात मेट्रो गाडी कशी ने-आण करणे शक्य होईल, याचा तांत्रिक अभ्यास करावा लागेल.

बुलेट ट्रेनच्या जागेचा पर्याय

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिष्ठेचा केला असून, देशाच्या अमृत महोत्सवी वर्षांत म्हणजे २०२२ मध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याची त्यांची योजना आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेनसाठी जागा देण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. या जागेची मालकी असलेल्या मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या बैठकीत ही जागा बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या स्थानकासाठी देण्याचा निर्णय झाला होता आणि त्याला राज्य सरकारने मान्यता दिली होती. वांद्रे-कुर्ला संकुलात २९ हेक्टर इतकी जागा असून, यापैकी ११ हेक्टर जागा बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आरक्षित करण्यात आली. या जागेचा ताबा अद्याप बुलेट ट्रेन प्रकल्पाला देण्यात आलेला नाही. या जागेवर मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाची मालकी आहे. केंद्रात काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सत्तेत असताना वांद्रे-कुर्ला संकुलाच्या या जागेत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र उभारण्याची योजना होती. पण मोदी सरकारने वित्तीय केंद्र गुजरातमध्ये हलविल्याने ही जागा बुलेट ट्रेनला देण्यात आली होती.

पंतप्रधानांची नापसंती..

बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन आठवडय़ांपूर्वी आढावा घेतला होता. महाराष्ट्रातील भूसंपादन व अन्य कामे रखडल्याने मोदी यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली होती. तसेच हे काम लवकर मार्गी लागावे अशी अपेक्षा व्यक्त केली होती. महाराष्ट्र सरकार सहकार्य करत नसल्यास अहमदाबाद ते महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याची सूचना मोदी यांनी केली. राज्यात सत्ताबदल झाल्यापासून बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाला गती येऊ शकली नाही. ठाकरे सरकार भूसंपादन व अन्य महत्त्वाच्या कामांसाठी सहकार्य करीत नाही, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातो.

 ‘अधिकाराच्या गैरवापरातून जागा हस्तांतरणाचा निर्णय’

मुंबई :  मेट्रो-३च्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील १०२ एकर जमीन ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरित करण्याच्या उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयामागे राज्यात झालेले सत्तांतर आणि बदललेली धोरणे कारणीभूत आहेत. याच बदललेल्या स्थितीतून दुसरी बाजू ऐकून न घेता उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी दुराग्रहाने हस्तांतरणाचा निर्णय घेतला, असे ताशेरे उच्च न्यायालयाने ओढले आहेत. जमीन हस्तांतरण निर्णयाला स्थगिती दिल्याने सार्वजनिक प्रकल्प रखडेल, याची आम्हाला जाणीव आहे. मात्र, प्रशासनाचा निष्काळजीपणा त्यास जबाबदार असून त्यांनी ती स्वीकारावी, असेही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने सुनावले.

बुलेट ट्रेनच्या जागेवर मेट्रो कारशेड उभारल्यास मेट्रो प्रकल्प कायमस्वरूपी अव्यवहार्य ठरेल. त्यामुळे असे सल्ले संपूर्ण राज्याला आणि सरकारला बुडवणारे आहेत.

– देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

वांद्रे-कुर्ला संकुलातील बुलेट ट्रेन स्थानकाच्या जागेसह गोरेगावातील पहाडी आणि अन्य जागांचाही मेट्रो कारशेडसाठी विचार सुरू आहे.

– अनिल परब, परिवहनमंत्री

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2020 12:21 am

Web Title: land testing in bandra kurla complex for car shed abn 97
Next Stories
1 मेल-एक्स्प्रेसच्या प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी
2 लसीकरणाची तयारी पूर्ण!
3 नाइलाजाने विनातिकीट
Just Now!
X