केंद्र आणि राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारत महापरिनिर्वाण दिनी इंदू मिलमध्ये भूमिपूजन करण्याचा रिपब्लिकन नेत्यांच्या निर्धार कडेकोट बंदोबस्तामुळे बारगळला. पोलीस बंदोबस्तामुळे इंदू मिलच्या प्रवेशद्वाराजवळही पोहोचता न आल्यामुळे अखेर रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना पदपथावरच कोनशीला ठेवून स्मारकाचे भूमिपूजन उरकावे लागले.
गुरुवारी रात्री पक्षाच्या युवक आघाडीचे काही कार्यकर्ते समुद्रकिनाऱ्यालगतची भिंत ओलांडून इंदू मिलमध्ये शिरले आणि त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे प्रतिकात्मक भूमिपूजन केले. त्यामुळे शुक्रवारी इंदू मिल परिसरात प्रचंड पोलीस फौजफाटा होता. न्यायालयाच्या आदेशामुळे कोणत्याही परिस्थितीत इंदू मिलमध्ये कोणालाही प्रवेश करू द्यायचा नाही, असा निर्धार  पोलिसांनी केला होता. सकाळी ११ च्या सुमारास रामदास आठवले आपल्या समर्थकांसह इंदू मिल परिसरात आले. परंतु पोलीस बंदोबस्तामुळे त्यांना मिलमध्ये प्रवेश करता आला नाही. अखेर इंदू मिलच्या बाहेर पदपथावरच एक कोनशीला ठेवून, बुद्धवंदना म्हणून रामदास आठवले यांनी स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोपस्कार उरकून घेतला.
चैत्यभूमीवर डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील, माणिकराव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, खा. गोपीनाथ मुंडे, महापौर सुनील प्रभू, पालिका आयुक्त सीताराम कुंटे आदींनी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिली.

डॉ. आंबेडकरांचे स्मारक होणारच – मुख्यमंत्री
केंद्र सरकारच्या घोषणेनुसार दादरमधील इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. परंतु रिपब्लिकन नेते आणि कार्यकर्त्यांनी आंदोलने करून स्मारकाचे पावित्र्य घालवू नये, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहिल्यानंतर चैत्यभूमीवर पत्रकारांशी बोलताना हाणला.

सरकारकडून फसवणूक – मुंडे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा देण्याबाबतचे विधेयक लोकसभेच्या अधिवेशनाच्या कार्यक्रमपत्रिकेवर आढळले नाही. इंदू मिलची जागा देण्याबाबत केवळ घोषणाबाजी करून केंद्र सरकारने आंबेडकरी जनतेची फसवणूक केली आहे, असा आरोप गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे.