१९७६ सालचा दर आकारल्याबद्दल आश्चर्य; ओशिवरा येथे मोक्याच्या जागी भूखंड
भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी यांच्या नाटय़ विहार केंद्राला ओशिवरा येथील मोक्याच्या ठिकाणी असलेला सुमारे दोन हजार चौरस मीटर इतका भूखंड केवळ ७० हजार रुपयांत वितरित करण्यात आला आहे. मोकळी उद्याने ताब्यात घेण्याचे आदेश एकीकडे देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी उद्यानासाठी आरक्षित असलेला भूखंड हेमामालिनी यांना देण्यात आला, तसेच १९७६च्या रेडीरेकनरचा दर आकारल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
हेमामालिनी यांना यापूर्वी वर्सोवा येथील न्यू लिंकिंग मार्गावरील भूखंड वितरित करण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी दहा लाख रुपयांचा भरणा उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला होता. मात्र या भूखंडाचा काही भाग सीआरझेडबाधित असल्यामुळे बांधकाम करण्यात अडचण होती. भूखंडविषयक नियम व अटींनुसार या भूखंडावर करावयाच्या बांधकाम खर्चाच्या २५ टक्के रक्कम शासनाकडे जमा करणे आवश्यक होते. परंतु हेमामालिनी यांच्या संस्थेने पूर्तता केली नाही. तरीही हा भूखंड शासनाकडून परत घेण्यात आला नाही. उलट या भूखंडाच्या मोबदल्यात आता पर्यायी भूखंड ओशिवरा येथे वितरित करण्यात आला आहे.
पर्यायी भूखंड मिळावा अशी मागणी हेमामालिनी यांनी २००७ मध्ये केली. त्या वेळी ओशिवरा येथील २९ हजार ३६० चौरस मीटर हा उद्यानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडापैकी दोन हजार चौरस मीटर भूखंडाची मागणी केली. याशिवाय संपूर्ण भूखंड उद्यान म्हणून विकसित करण्याची तयारीही हेमामालिनी यांच्या संस्थेने दाखविली. हा प्रस्ताव २०१० मध्ये मान्य करण्यात आला होता, परंतु याबाबात शासनाने उपस्थित केलेल्या मुद्दय़ांबाबत समाधानकारक स्पष्टीकरण संस्थेकडून देण्यात आले नाही. अखेरीस अचानक या भूखंडाचे वितरण २३ डिसेंबर २०१५ रोजी करण्यात आले. त्यानंतर १५ जानेवारी २०१६ मध्ये उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र जारी
केले. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी १९७६चा दर हेमामालिनी यांच्या संस्थेला लागू केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.