News Flash

प्रस्तावित भाडे कायद्याबाबत घरमालक संभ्रमात!

आजही अशा चाळी वा इमारती आहेत ज्यामध्ये मूळ भाडेकरू राहत आहेत आणि ते क्षुल्लक भाडे देत आहेत.

निशांत सरवणकर, लोकसत्ता

मुंबई : केंद्र सरकारने आदर्श भाडे कायद्याला मंजुरी दिल्याने जुना भाडे कायदा रद्द होणार आहे. घरमालकांना बाजारभावाने भाडे आकारण्याची मुभा मिळणार असल्यामुळे भाडेकरू चिंताग्रस्त झाले आहेत. मात्र याबाबत आमची बाजू कोणी समजूनच घेत नाही, असे म्हणणाऱ्या घरमालक तसेच भाडेकरूंमध्ये संभ्रम कायम आहे.

प्रस्तावित कायदा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार नाही, असे केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी म्हटले असले तरी प्रत्यक्षात कायद्यात तसा उल्लेख नाही. प्रसिद्ध वास्तुरचनाकार चंद्रशेखर प्रभू यांच्या म्हणण्यानुसार, खरेतर या नव्या भाडे कायद्याची काहीही आवश्यकता नाही. आपल्याकडे लिव्ह अँड लायसन्स कायदा अस्तित्त्वात असून त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. जुन्या इमारती, चाळींतील घरे ही पागडी देऊन खरेदी करण्यात आली आहेत. त्यामुळे आता भाडे क्षुल्लक असले तरी घरमालकांनी किमत वसूल केलेली आहे. त्यामुळे त्यांना तुटपुंज्या भाडय़ाबाबत ओरड करण्याचा अजिबात अधिकार नाही, असे प्रभू यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने २००० सालात पागडीलाही अधिकृत दर्जा दिला आहे, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, या नवा भाडे कायदा लागू झाला तर पागडी देऊन घर खरेदी केलेल्या २५ लाखांहून अधिक भाडेकरूंवर बेघर व्हायची पाळी येईल. २००२ नंतरच्या पुनर्विकासातील घरांबाबत अगोदरच बाजारभावाने भाडे आकारले जात आहे. त्यामुळे ते मूळ जुन्या इमारतीतील भाडेकरू असले तरी त्यांना हा कायदा लागू होत नाही. उर्वरित भाडेकरूंपैकी बहुतांश सर्वानी पागडी देऊन घर खरेदी केलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर हा नवा कायदा लादणे अन्यायकारक होईल, असे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे.

आजही अशा चाळी वा इमारती आहेत ज्यामध्ये मूळ भाडेकरू राहत आहेत आणि ते क्षुल्लक भाडे देत आहेत. यापैकी असंख्य भाडेकरून घरे बंद करून अन्यत्र राहायला गेले आहेत. परंतु आपल्या भाडेकरू म्हणून हक्क कायम ठेवला आहे. अशा चाळमालकांना या भाडेकरूंवर कारवाई करणेही कठीण झाले आहे. त्यासाठी प्रस्तावित कायदा आवश्यक असल्याचे मत अनेक मालकांनी व्यक्त केले आहे.

नव्या कायद्यातील अनुत्तरित मुद्दे

’ ज्या ठिकाणी करारनामा अस्तित्त्वात नाही अशावेळी भाडेकरूसोबत नवा करारनामा करावा का?

’  मूळ भाडेकरूचे निधन झाल्यास त्याच्या वारसासोबत करारनामा करून बाजारभावाने भाडे घ्यावे का?

’ वारस हा भाडेहक्क मागू शकतो का? चाळमालकाला ते बंधनकारक आहे का?

’ भाडे करारनाम्याऐवजी चाळमालक लिव्ह अँड लायसन्स करारनामा करू शकतो का?

’ भाडे करारनामा ठराविक मुदतीपुरता करता येईल का? त्यानंतर करारनाम्याचे नूतनीकरण न केल्यास भाडेकरूला घर रिक्त करावे लागेल का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2021 3:56 am

Web Title: landlords confused about proposed rent law zws 70
Next Stories
1 घरबसल्या शिकाऊ ‘लायसन्स’ मिळण्याची सोय
2 ऑनलाइन वर्गाना बसू देण्याच्या वादाबाबतही  समिती आदेश देऊ शकेल का?
3 लसीकरण केंद्रांवर राजकीय जाहिरातींना मनाई
Just Now!
X