विमानात भव्य बिछाना, आलिशान बाथरूम आणि दिमतीला सेवक असलेली खोली; प्रवासभाडे १५ लाख!
लंडनला जाण्यासाठी सामानाची आवराआवर होते.. तेवढय़ात दारात आलिशान लिमोझिन गाडी येऊन उभी राहते.. याच गाडीतून तुम्ही विमानतळ गाठता.. तेथे अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंसाठीच्या प्रतीक्षालयात तुमची व्यवस्था होते.. मग विमानात शिरताच तुमचा प्रवेश आलिशान खोलीत होतो.. येथे एक भव्य बिछाना, पंचतारांकीत हॉटेलसारखं बाथरूम आणि दिमतीला स्वतंत्र आचारी, सेवक.. एरवी सर्वसामान्यांना स्वप्नवत वाटणाऱ्या हवाई सफरीलाही मागे टाकणारी ही कल्पना आता प्रत्यक्षात अवतरली आहे. इत्तेहाद एअरलाइन्स या कंपनीने आपल्या विमानांच्या प्रवाशांसाठी अशी सुविधा सुरू केली असून मुंबई ते लंडन अशा हवाई सफरीत याचा आनंद घेता येणार आहे. अर्थात या स्वप्नवत सफारीचे प्रवासभाडे आहे १५ ते १८ लाख रुपये!
मुंबईत पहिल्यांदाच सेवा सुरू करत असलेल्या इत्तेहाद एअरलाइन्सच्या ए-३८० या विमानांत राजेशाही थाटातील दोन खोल्या व वैयक्तिक न्हाणीघरासह अद्ययावत अशी निवासी व्यवस्था करण्यात आली आहे. दोघांसाठी असलेल्या या सोयीशिवाय प्रथम श्रेणी दर्जाचे अपार्टमेण्ट, बिझनेस क्लाससाठीचे कक्ष आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी अधिक आरामदायक आसनव्यवस्था अशा सोयींनी हे विमान सुसज्ज आहे. सध्या हे विमान मुंबई-लंडन, मुंबई-न्यूयॉर्क आणि मुंबई-अबुधाबी या तीन मार्गावर चालणार आहे.
इत्तेहादने मुंबईत १ मे पासून ए-३८० हे नवीन आलिशान एअरबस श्रेणीतील विमान सुरू केले आहे. पंचतारांकित हॉटेलला लाजवेल अशा सुखसोयी चक्क विमानात देण्यात आल्या आहेत. या अलिशान कक्षात शिरल्यानंतर सर्व पंचतारांकित सुखसोयी प्रवाशांचा अनुभव द्विगुणीत करणार आहेत. यात दोघांना बसण्यासाठी आरामदायक सोफा, ३२ इंची एलईडी टीव्हीची खास सोय असणार आहे. या कक्षात खास खानसामा प्रवाशांना लज्जतदार खाण्याची मेजवानी देण्यासाठी सज्ज राहणार असून त्याशिवाय एक बटलरही दिमतीला असेल. तसेच आतील बाजूस दोघांसाठीचा ६ फूट लांब आणि १० फूट रूंद असा सुंदर आरामदायी बिछाना असून या खोलीतही छोटा टीव्ही प्रवाशांचे मनोरंजन करणार आहे. त्याशिवाय या दोन कक्षांच्या मध्ये स्वच्छतागृह असून त्यात शॉवरची सोय देण्यात आली आहे.
विमान कंपन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रवासी विमानात आलिशान खासगी कक्ष इत्तेहाद एअरवेजने तयार केला आहे. मुंबईतून नव्याने सुरू झालेल्या मुंबई-लंडन, मुंबई-न्यूयॉर्क आणि मुंबई-अबुधाबी या तीन मार्गावर हे ए-३८० विमान उड्डाण करणार आहे. या खासगी कक्षाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना घरातून विमानतळावर आणि विमानतळावरून पुन्हा घरी नेण्यासाठी लिमोझीन ही आलिशान गाडी दिमतीला असून विमानतळावरही इत्तेहादच्या दिमाखदार प्रतीक्षालयात या प्रवाशांची उठबस करण्यात येईल. या कक्षासाठी प्रवाशांच्या खिशाला मात्र चांगलीच फोडणी बसणार असून यासाठी १५ ते १८ लाख रुपये मोजावे लागणार आहेत.