मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटजवळ दरड कोसळल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. अपघातामध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी आहेत. रविवार असल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असते. त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागतेय.
आज दुपारच्या सुमारास मुंबई–पुणे महामार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली. दरडीखाली दोन गाड्या अडकल्या असून, यात दोनजण ठार झाल्याचे वृत्त आहे. भाईंदर येथे राहणारे दिलीपभाई गोपाळभाई पटेल (५२) आणि डोंबिवलीचे शशिकांत धामणकर यांचा मृत्यू झाला असून, निर्मला पटेल, सुशीलाबाई धामणकर आणि मंगल माने जखमी झाल्या आहेत.
दरड हटवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, मोठ्या प्रमाणावर दरड कोसळल्यामुळे काम पूर्ण होण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईकडे जाणारी एका रस्त्याची वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
२२ जूनला खंडाळा बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मुंबई-पुणे महामार्गाची वाहतूक तब्बल २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर महिन्याभराच्या आतच दरड कोसळण्याची ही दुसरी घटना घडली आहे.