मुंबई : मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी कांदिवली परिसरातील बांडडोंगरीजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली. या दुर्घटनेत तेथून जाणाऱ्या एका वाहनातील प्रवाशाला दुखापत झाली. मातीचा ढिगारा हटवून महामार्गावरील दोन मार्गिका वाहतुकीसाठी मोकळ्या करण्यात आल्या. परंतु डोंगराचा काही भाग ढासळण्याची शक्यता लक्षात घेत उर्वरित मातीचा ढिगारा उपसण्याचे काम तज्ज्ञांच्या सल्ल्याने करण्याचा निर्णय मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएने संयुक्तपणे घेतला आहे. त्यामुळे तूर्तास या परिसरातील द्रुतगती महामार्गावरील दोन मार्गिका वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात येणार आहेत.

मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असून मंगळवारी भल्या सकाळी ६च्या सुमारास बांडडोंगरी जवळील डोंगराचा काही भाग ढासळला आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मातीचा ढिगारा उपसून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. दरम्यानच्या काळात भूगर्भशास्त्र अभ्यासकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. संबंधित डोंगरावर विद्युतपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचा मनोरा उभा आहे. तसेच डोंगर भुसभुशीत आहे. ढिगारा उपसताना दरड कोसळण्याची भीती आहे. ही बाब लक्षात येताच तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार महामार्गावरील उर्वरित मातीचा ढिगारा हटविण्याचे काम हाती घेण्याचा निर्णय दोन्ही यंत्रणांनी घेतला.

महामार्गावरील दोन मार्गिका माती हटवून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. उर्वरित दोन मार्गिकांवरील मातीचा ढिगारा दोन-तीन दिवसांत हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.