News Flash

मुंबई ड्रग्जचे आगर!

अमली पदार्थ तस्करीच्या घटना वर्षांच्या शेवटीच नव्हे तर वर्षभर सुरू असतात

प्रतिनिधिक छायाचित्र

नववर्षांच्या पाटर्य़ासाठी मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थाची तस्करी; कोकणमार्गे गोव्यात पुरवठा

नोटाबंदीमुळे निर्माण झालेल्या चलनकल्लोळात अवघा देश अडकला असताना मुंबईला अमली पदार्थाचा विळखा पडू लागल्याची धक्कादायक माहिती उघडकीस येत आहे. नववर्षांच्या निमित्ताने ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या रेव्ह पाटर्य़ासाठी गेल्या काही महिन्यांपासून मुंबईत मोठय़ा प्रमाणात ‘ड्रग्ज’चा साठा केला जात असून यात परदेशी नागरिकांसह स्थानिकांचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. विशेष म्हणजे, हे अमली पदार्थ मुंबईतच पुरवले जात नसून यापैकी मोठा साठा कोकणमार्गे गोव्याकडे रवाना केला जात असल्याचेही समोर येत आहे.

वर्षांच्या कॅलेंडरचा प्रवास वर्षपूर्तीकडे जात असताना मुंबईत विविध मार्गानी ड्रग्सचा शिरकाव होऊ लागला आहे. गेल्या सहा महिन्यांत मुंबईत व मुंबईशी संबंधित मोठी ड्रग्सची प्रकरणे उघडकीस आली आहेत. यामागील मूळ कारण म्हणजे ३१ डिसेंबरच्या वर्षपूर्तीच्या ‘पाटर्य़ासाठी’ हे अमली पदार्थ मुंबईत येत आहेत. गोवा येथे नोव्हेंबरनंतर पर्यटन हंगाम सुरू होतो, त्यामुळे तेथे विदेशी नागरिक व ‘उच्चभ्रू भारतीयांचे’ चोचले पुरवण्यासाठी ड्रग्स विक्री केली जाते. गोवा येथे कोकणमार्गे ड्रग्स पोहोचवले जात असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. कोकेन, हशीष, चरस, एलएसडी डॉट्स, इकॅस्टसी व मेफॅड्रीन टॅबलेट्स या ड्रग्सची तस्करी करण्यात येत असल्याचे दिसून येते.

अशी होते तस्करी..

* आफ्रिकन देशातील नागरिकांकडून मुख्यत्वे हा व्यापार केला जातो. मुंबई किंवा देशात येताना येथे व्यवसाय करणाऱ्यांची त्यांना माहिती नसते. त्यांना फक्त विमानतळावरून एका हॉटेलमध्ये जाण्याचा पत्ता दिलेला असतो.

* हॉटेलवर आल्यावर या व्यवसायाशी संबंधित मुंबईतील व्यक्ती तासाभरात त्यांच्याकडे पोहचते. एकमेकांना ओळखण्यासाठी ही मंडळी सांकेतिक भाषेचा वापर करतात. त्यानंतरच आपल्याकडील अमली पदार्थ ते स्थानिक व्यक्तीकडे सोपवतात.

* हॉटेलवर आलेली परदेशी व्यक्ती तात्काळ मायदेशी निघून जाते. या व्यक्तीला एका खेपेचे जवळपास काही हजार डॉलर मानधन मिळते, अशी माहिती तपासयंत्रणेतील अधिकाऱ्याने दिली.

मुंबईशी संबंधित २०१६ मधील घटना

mv02* २५ एप्रिल- मुंबईकर अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्यासह तिचा पती विकी यांच्यावर २ हजार कोटींच्या इफ्रेडीनप्रकरणी गुन्हा

* मार्च- मुंबई पोलिसातील हवालदार काळोखे याच्याकडे १०० किलो ड्रग्स आढळले होते.

* ३१ ऑक्टोबर- उदयपूर येथे पकडण्यात आलेल्या ३ हजार कोटींच्या ड्रग्स साठय़ाप्रकरणी निर्माते सुभाष दुधानी यांना अटक

* २ नोव्हेंबर- कुर्ला स्थानकात ३ जणांना ४२ लाखांचे हशीष व १०३ किलोच्या चरससह अटक.

* १४ नोव्हेंबर- किशोर नंदन या मूळ भारतीय डच नागरिकाला ६० लाखांचे ‘एलएसडी डॉट्स’ व ४० लाख किमतीच्या ‘इकॅस्टसी’ गोळ्यांसह मुंबईत अटक.

* १५ नोव्हेंबर- विझेयगो मेड (२७) या अफ्रिकन महिलेला विमानतळावरून १२ कोटींच्या २ किलो कोकेनसह अटक.

 

मुंबईत वाढती तस्करी

‘नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार गेल्या दोन वर्षांत मुंबईत सर्वाधिक अमली पदार्थाची तस्करी पकडल्याच्या घटना घडल्या आहेत.

वर्ष             २०१४           २०१५

महाराष्ट्र      १४,६२२       १८,९७९

मुंबई          १४,२७४      १८,६२८

अमली पदार्थ तस्करीच्या घटना वर्षांच्या शेवटीच नव्हे तर वर्षभर सुरू असतात. नववर्ष जल्लोषाच्या तयारीसाठी वर्षांच्या शेवटी अशा घटनांमध्ये वाढ होते, कारण मुंबई व गोव्यात मोठय़ा प्रमाणात ३१ डिसेंबरच्या ‘पाटर्य़ा’ होतात. त्यासाठी हे परदेशातून आलेले ड्रग्स वापरले जाते. त्यामुळे सध्या आम्ही सर्वच बाजूने मुंबईवर लक्ष ठेवून आहोत.

– संजय झा, विभागीय संचालक, नार्कोटिक्स नियंत्रण विभाग, मुंबई

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2016 2:10 am

Web Title: large drug trafficking for new year party
Next Stories
1 पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन सेवेसाठी एकच हेल्पलाइन
2 शहरबात : थोडी खुशी, थोडा गम..
3 शस्त्रसंधीच्या उल्लंघनामागे पाकचे राजकारणच!
Just Now!
X