पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यावर अमली पदार्थविरोधी पथकाचा भर

मुंबई : टाळेबंदीनंतर आंध्र प्रदेश, तेलंगण राज्यांतील नक्षलग्रस्त भागांतून शहरात वाढलेली गांजाची तस्करी आणि शहरातील गांजा सेवन करणाऱ्यांत भर पडल्याने अमली पदार्थ यंत्रणांसमोर दुहेरी आव्हान उभे ठाकले आहे. तूर्तास शहरात होणारी गांजा तस्करी रोखण्यासाठी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने पुरवठा साखळी लक्ष्य करण्याची योजना आखली आहे.

काही वर्षांपूर्वी मुंबईत गांजाचे सेवन करणाऱ्यांमध्ये बहुतांश श्रमिकांचा समावेश होता. ठरावीक वर्ग गांजा सेवन करत होता. मात्र अलीकडे या वर्गात विद्यार्थी, तरुण, कॉपरेरेट क्षेत्रात काम करणारे, चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींचीही भर पडली. त्यामुळे गांजाची मागणी वाढली. परिणामी गांजाची तस्करीही मोठय़ा प्रमाणात होऊ लागली, असे निरीक्षण अमली पदार्थविरोधी यंत्रणा नोंदवतात. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिलेल्या माहितीनुसार अन्य अमली पदार्थाच्या तुलनेत गांजा स्वस्त आणि सहज उपलब्ध होतो. गांजा नैसर्गिक अमली पदार्थ आहे. त्यामुळे कोके न, एमडी, हेरॉईन किं वा अन्य रासायनिक अमली पदार्थाच्या तुलनेत गांजाचे शरीरावरील दुष्परिणाम लवकर दिसत नाहीत. त्यामुळे गांजा सेवन शरीरासाठी चांगले हा गैरसमज करून घेत शरीरसौष्ठव करणारे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वेळकाळ न पाहाता सतत काम करणारे, वजन वाढविण्यासाठी धडपडणारे गांजा औषध समजून सेवन करत आहेत. श्रमपरिहाराचा उत्तम मार्ग म्हणून धनदांडगेही गांजाकडे वळले आहेत. त्यामुळे गांजाची मागणी वाढली.

ओडिशाखालोखाल आंध्र प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये गांजाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घेतले जाते आणि तेथूनच ते टप्प्याटप्प्याने विविध शहरांत आणले जाते. गेल्या दोन महिन्यांत अमली पदार्थविरोधी पथकाच्या वांद्रे कक्षाचे प्रभारी निरीक्षक अनिल वाढवणे आणि सहकाऱ्यांनी पाच कारवायांमध्ये सुमारे २२२ किलो गांजा हस्तगत के ला. या सर्व खेपा आंध्र प्रदेश, तेलंगणमधील नक्षलग्रस्त भागाजवळून

टप्प्याटप्प्याने मुंबईत आल्या होत्या. त्यामुळे गांजाची वाढलेली तस्करी रोखण्यासोबत नक्षलवाद्यांना या तस्करीतून उपलब्ध होणारा निधी, अशा दोन्ही बाजू गुन्हे शाखेकडून तपासल्या जात आहेत. गांजाचे उत्पादन विविध राज्यांमध्ये होते. त्याप्रमाणे तो विविध मार्गानी मुंबईपर्यंत येतो. आतापर्यंतच्या तपासात गांजा तस्करीत नक्षलवाद्यांचा सहभाग दर्शवणारा दुवा हाती आलेला नाही. मात्र गांजाची तस्करी वाढली आहे. स्वस्त आणि नैसर्गिक अमली पदार्थ असल्याने त्याकडे पारंपरिक वर्गाव्यतिरिक्त अन्य व्यक्ती आकर्षित होत आहेत. त्यामुळे गांजा तस्करी रोखण्यासाठी पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यावर भर देत आहोत, अशी प्रतिक्रि या अमली पदार्थविरोधी पथकाचे प्रमुख दत्ता नलावडे यांनी नोंदवली.

कारवाया

’ २१ ऑक्टोबर : हैदराबाद, सोलापूर, पुणेमार्गे मुंबईत आलेला २१ किलो गांजा पवईत हस्तगत

’ ५ नोव्हेंबर : निजामाबाद, तेलंगणमार्गे मुंबईत आलेला ४२ किलो गांजा हस्तगत

’ २४ नोव्हेंबर : हैदराबादच्या हसननगर येथून मुंबईत वाहून आणलेला २१ किलो गांजा हस्तगत

’ २५ नोव्हेंबर : आंध्र प्रदेशच्या अण्णावरम येथून मुंबईत आलेला १०२ किलो गांजा हस्तगत

’ १३ डिसेंबर : तेलंगणच्या सिकं दराबादमधून मुंबईत आलेला ३६ किलो गांजा हस्तगत