मुंबईतील सात विभागांत ५० दिवसांत बाधितांच्या संख्येत मोठी भर

मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत नियंत्रणात येऊ घातलेली मुंबईतील करोनास्थिती पुन्हा एकदा बिघडू लागली आहे. गणेशोत्सव आटोपल्यापासून शहरात दररोज दोन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होऊ लागली आहे. त्यातच बोरिवली, दहिसर,कांदिवली, ग्रॅन्ट रोड, गोरेगाव, अंधेरी-पश्चिम, मुलुंड या विभागांमधील रुग्णदुपटीचा कालावधी ५० दिवसांपेक्षाही कमी झाला आहे.

ऑगस्टमध्ये गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी मुंबईमधील करोनाबाधितांच्या संख्येवर पालिके ने नियंत्रण मिळवले होते. वाढत चाललेला रुग्णदुपटीचा कालावधी हे त्याचे प्रमुख लक्षण होते. काही भागांत रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी १०० दिवसांवर गेला होता. तसेच दररोज सरासरी ७५० रुग्णांची नोंद होत होती. मात्र गणेशोत्सवानिमित्त गावी जाण्याची लगबग, तसेच खरेदीसाठी उसळलेली गर्दी, पायदळी तुडविला गेलेला सामाजिक अंतराचा नियम आदींचे परिणाम आता मुंबईत दिसू लागले आहे. सध्या मुंबईत दोन हजारांच्या आसपास करोनाबाधित सापडत आहेत. दुसरीकडे पालिके ने करोना चाचण्या तब्बल १५ हजारांवर नेल्यानेही बाधितांची संख्या अधिक दिसते आहे. बाधितांना वेळीच विलगीकरणात हलवून संसर्गावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न पालिकेने सुरू आहेत. मात्र तरीही पालिकेला रुग्णदुपटीच्या काळावर नियंत्रण मिळविणे अवघड बनले आहे.

रुग्णदुपटीचा काळ बोरिवली (४२ दिवस), दहिसर (४४), कांदिवली (४५), ग्रॅन्ट रोड (४५), गोरेगाव (४६), अंधेरी-पश्चिम (४६), मुलुंड (४६) या परिसरांत खालावत चालला आहे. करोनाबाधितांची सर्वाधिक संख्या बोरिवली, मालाड आणि अंधेरी पूर्व परिसरांत असून या भागातील बाधितांच्या संख्येने १० हजारांचा आकडा ओलांडला आहे. तर गेल्या सात दिवसांमध्ये बोरिवलीत प्रतिदिन ११८ ते १९२ दरम्यान रुग्ण सापडत आहेत. त्याखालोखाल मालाड आणि  अंधेरी-पूर्व परिसराचा क्रमांक लागतो. सॅण्डहर्स्ट रोड (‘बी’ विभाग) परिसरात सर्वात कमी म्हणजे १४०५ इतके रुग्ण आढळून आले आहेत.

बोरिवलीत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

बोरिवलीमधील (आर-मध्य विभाग) रुग्णसंख्या १०,२२३ वर पोहोचली असून येथील ७,८७३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, तर ३११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला बोरिवलीत सर्वाधिक २,०३९ सक्रिय रुग्ण आहेत. सॅण्डहर्स्ट रोड (बी विभाग) परिसरात सर्वाधिक कमी म्हणजे एक हजार ४३० जणांना करोनाची बाधा झाली असून तेथील एक हजार १०८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ९७ रुग्णांचा मृत्यू झाला असून २२५ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत.