|| शैलजा तिवले
राज्यात वीस दिवसांत रुग्णसंख्या दुप्पट
मुंबई : राज्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाला असला तरी डेंग्यूचा प्रादुर्भाव मात्र झपाट्याने वाढत आहे. गेल्या २० दिवसांतच डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास दुपटीहून अधिक वाढली असून एकूण रुग्णसंख्येने साडेपाच हजारांचा आकडा पार केला आहे. मृतांचे प्रमाण मात्र तुलनेने कमी आहे.

दरवर्षी ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे डेंग्यूचा प्रसार वाढतो. गेल्या वर्षी करोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात होते, तर डेंग्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते. परंतु या वर्षी करोनासह डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे.

१६ ऑगस्टच्या आकडेवारीनुसार, राज्यातील डेंग्यूच्या रुग्णांची संख्या २५५४ होती. पुढील पाच दिवसांतच म्हणजे २१ ऑगस्टला रुग्णांची संख्या ४९९७ वर गेली. सप्टेंबर महिना सुरू झाला तसा डेंग्यूचा कहर आणखीनच वाढला असून ७ सप्टेंबरला राज्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या ५७४६ पर्यंत गेली आहे.

गेल्या वर्षभरात ३३५६ डेंग्यूचे रुग्ण आढळले होते, तर १० जणांचा मृत्यू झाला होता. या वर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीलाच रुग्णसंख्येने साडेपाच हजारांचा टप्पा गाठला आहे. आत्तापर्यंत डेंग्यूमुळे राज्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून नागपूरमध्ये मनपा आणि ग्रामीण क्षेत्रात मिळून सहा, तर वर्धा, चंद्रपूर, ठाणे, भंडारा, नगर येथे प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.

ग्रामीण भागाच्या तुलनेत महापालिका क्षेत्रांमध्ये हा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्याचे आढळले आहे. घराघरांमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी मोठ्या महानगरपालिकेला ५० तर ग्रामीण आणि छोट्या नगरपालिकांमध्ये २५ स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सप्टेंबरपासून सर्वेक्षण सुरू झाले असून घराजवळील परिसरांमध्ये डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करणे हे प्रामुख्याने या स्वयंसेवकांचे काम असते. यामुळे आता वेगाने प्रादुर्भाव रोखण्याचे काम सुरू झाले आहे, असे राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांनी सांगितले.

सर्वाधिक प्रादुर्भावाचे जिल्हे

डेंग्यूचा सर्वाधिक प्रादुर्भाव नागपूर, वर्धा, पुणे, चंद्रपूर, यवतमाळ, नाशिक, अमरावती, सोलापूर येथे झाला असून रुग्णवाढही याच जिल्ह्यांमध्ये आहे. त्या खालोखाल मुंबई, कोल्हापूर, पिंपरी चिंचवड शहर येथेही रुग्णसंख्या वाढत आहे.

चिकुनगुनियाचीही संसर्गवाढ

राज्यात चिकुनगुनियाच्या संसर्गाचे प्रमाणही वाढले असून गेल्या २० दिवसांत रुग्णांची संख्या ९३८ वरून १४४२ झाली आहे. गेल्या वर्षी वर्षभरात चिकुनगुनियाचे ७८२ रुग्ण आढळले होते. पुणे, नाशिक शहर आणि ग्रामीण, सातारा, पिंपरी चिंचवड महापालिका आणि कोल्हापूर येथे चिकुनगुनियाचा प्रादुर्भाव वाढत आहे.