भविष्यात आर्थिक परिस्थिती अधिकच हलाखीची होण्याची चिन्हे

महाराष्ट्र राज्य वीज नियामक महामंडळाने टाटा वीज कंपनीला मुंबईच्या शहर भागामध्ये वीजपुरवठा करण्याची परवानगी दिल्यानंतर स्वस्त वीजदरापोटी अनेक मोठय़ा वीजग्राहकांनी ‘बेस्ट’ला ‘टाटा’ करायला सुरुवात केली आहे. ‘बेस्ट’च्या परिवहन विभागाचे चाक तोटय़ात रुतले असतानाच आता मोठय़ा वीजग्राहकांनी साथ सोडल्याने विद्युतपुरवठा विभागालाही झटका बसू लागला आहे. परिणामी, भविष्यात बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती अधिकच हलाखीची बनण्याची चिन्हे आहेत.

मुंबईमधील कुलाबा ते वांद्रे या शहर भागामध्ये बेस्ट उपक्रमातर्फे वीजपुरवठा करण्यात येतो. या परिसरातील रहिवाशांसह मोठमोठी पंचतारांकित हॉटेल, रुग्णालये, बडय़ा कंपन्यांची कार्यालये, छोटे-मोठे उद्योगधंदे आदी ‘बेस्ट’ने पुरवलेल्या विजेवर लखलखून निघतात. पंचतारांकित हॉटेल, रुग्णालये, मोठे उद्योग, कंपन्यांची कार्यालये ही बेस्टची सर्वात मोठे ग्राहक मानले जातात. यापैकी काहींना दररोज हजारो युनिट विजेची आवश्यकता भासते. काही पंचतारांकित हॉटेल आणि रुग्णालयांमध्ये महिन्याला एक लाख युनिटच्या आसपास वीज वापरली जाते. त्यामुळे या सर्वाकडून ‘बेस्ट’च्या तिजोरीत वीज बिलापोटी मोठी रक्कम महसुलाच्या स्वरूपात जमा होते. त्यामुळेच विद्युतपुरवठा विभाग  ‘बेस्ट’ उपक्रमासाठी वरदान ठरला आहे.

मुंबई शहर भागामध्ये वीजपुरवठा करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी काही वर्षांपूर्वी टाटा वीज कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक महामंडळाकडे केली होती. त्याला ‘बेस्ट’ उपक्रमाने कडाडून विरोध केला होता. मात्र महाराष्ट्र राज्य वीज नियामक महामंडळने टाटा वीज कंपनीला काही अटीसापेक्ष शहर भागात वीजपुरवठा करण्याची परवानगी दिली. त्यामुळे शहरातील ग्राहकांना नवा पर्याय उपलब्ध झाला असून ते हळूहळू टाटा वीज कंपनीकडे वळू लागले आहेत. परिणामी, या निर्णयाचे चटके आता ‘बेस्ट’ उपक्रमाला बसू लागले आहेत.

महसुलावर परिणाम

मोठे वीजग्राहक साथ सोडू लागल्याने ‘बेस्ट’ उपक्रमाच्या विद्युतपुरवठा विभागाच्या महसुलावर परिणाम होऊ लागला आहे. महिन्याला २० लाख युनिट वापरणाऱ्या या ग्राहकांनी वीज घेणे बंद केल्यामुळे मोठा आर्थिक फटका ‘बेस्ट’ला बसू लागला आहे. परिवहन विभाग तोटय़ात चालत असताना आता विद्युतपुरवठा विभागाचे उत्पन्नही कमी होऊ लागल्याने ‘बेस्ट’ उपक्रम पूर्णच डबघाईला येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. राज्य सरकार आणि पालिका आर्थिक मदत करीत नाहीत आणि पालिका आयुक्तांनी सुचवलेल्या उपाययोजनांना बेस्ट समिती मंजुरी देत नाही. परिणामी, बेस्टची आर्थिक स्थिती अधिक बिकट बनू लागली आहे.

दोन टक्के ग्राहकांकडून ५० टक्के महसूल

मुंबईमधील विविध श्रेणीतील तब्बल ११ लाख ग्राहक बेस्टकडून वीज घेतात. त्यापैकी १९५ मोठे ग्राहक असून या ग्राहकांना दर महिन्याला साधारण ८० हजार ते १ लाख युनिट विजेचा पुरवठा केला जातो. त्याखालोखाल २०,२०० ग्राहकांकडून मोठय़ा प्रमाणावर विजेचा वापर केला जातो. एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत या ग्राहकांची संख्या २ टक्के असली तरी या ग्राहकांकडून ५० टक्के महसूल बेस्टला मिळतो.  वीजपुरवठय़ासाठी उपलब्ध झालेल्या पर्यायाचा फायदा घेत मुंबई शहरातील हॉटेल ताज, आयटीसी या पंचतारांकित हॉटेलनी ‘बेस्ट’ला अलविदा करत टाटा वीज कंपनीचा पर्याय निवडला आहे, तर हॉटेल ट्रायडंट, ग्लोबल रुग्णालयही आता ‘बेस्ट’ला ‘टाटा’ करण्याच्या बेतात आहे. आणखी काही मोठे वीजग्राहक ‘बेस्ट’ची गेली अनेक वर्षांची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत.