News Flash

प्रकल्पग्रस्तांच्या घरात घुसखोरी

मुंबई महापालिकेला प्रकल्पग्रस्तांसाठी मिळालेल्या घरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी झाली असून पालिका अधिकारी आणि तैनात केलेले खासगी सुरक्षारक्षक हतबल झाले आहेत.

| May 21, 2014 03:12 am

मुंबई महापालिकेला प्रकल्पग्रस्तांसाठी मिळालेल्या घरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर घुसखोरी झाली असून पालिका अधिकारी आणि तैनात केलेले खासगी सुरक्षारक्षक हतबल झाले आहेत. त्यामुळे तेथे तैनात असलेल्या खासगी सुरक्षारक्षकांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव नगरसेवकांनी स्थायी समितीत रोखून धरला. घुसखोरांची संख्या आणि त्यांच्याविरुद्ध केलेल्या कारवाईची माहिती सादर करावी, त्यानंतरच या प्रस्तावाला मंजुरी मिळेल, असा पवित्रा स्थायी समितीने घेतला आहे.
रस्ता रुंदीकरण आणि अन्य प्रकल्पांच्या आड येणाऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून पालिकेकडून पर्यायी घर दिले जाते. एमएमआरडीए आणि एसआरए योजनेअंतर्गत महापालिकेला प्रकल्पग्रस्तांसाठी घरे मिळाली आहेत. या घरांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेने ईगल कंपनीचे खासगी सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. एम-पूर्व आणि एम-पश्चिम विभागामध्ये पालिकेला प्रकल्पग्रस्तांसाठी सुमारे दोन हजार घरे मिळाली आहेत. मात्र बहुतांश घरांमध्ये घुसखोरांनी ठिय्या मांडला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून ही घरे विकण्याचा व्यवसाय काही गुंड करीत आहेत.  यावरून येथील गुंड टोळ्यांपुढे पालिका अधिकारी आणि ईगलच्या सुरक्षा रक्षकांनी गुढघे टेकल्याचे उघड होते, असा आरोप काँग्रेस नगरसेवक प्रवीण छेडा यांनी केला. किती घरांमध्ये घुसखोरी झाली आहे. त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली, याची तपशीलवार माहिती द्यावी, अशी मागणी छेडा यांनी केली.
प्रशासनाकडे घुसखोरांबाबत तपशीलवार माहिती आहे. ती सदस्यांना उपलब्ध केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी स्पष्ट केले. मात्र, इतरही सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध करीत आधी माहिती सादर करण्याची मागणी केली. त्यामुळे स्थायी समिती सदस्य यशोधर फणसे यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 3:12 am

Web Title: large scale intruder in bmc project households of mumbai
Next Stories
1 कळव्यातील ‘अप्पर क्रस्ट’ वसाहत प्रकरण : अभद्र युतीचा पोलिसांनाही ठेंगा
2 ठाण्यात शिवसेनेत धुसफूस
3 रोहा पॅसेंजर बॉम्ब अफवेमागे प्रेमभंगाची गोष्ट
Just Now!
X