दररोज एक ते दोन बाधितांची नोंद; २० उपचाराधीन रुग्ण

मुंबई : घनदाट लोकवस्तीच्या धारावीत दररोज एक किंवा दोन करोना रुग्ण आढळत आहेत, तर तेथील उपचाराधीन बाधितांची संख्या केवळ २० आहे. पहिल्या लाटेत महापालिकेची चिंता वाढवलेल्या धारावीने दुसऱ्या लाटेला थोपवल्याचे चित्र आहे.

मुंबईतील रुग्णसंख्या कमी होऊ लागली असताना सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या सात लाख लोकसंख्येच्या धारावीत सध्या एक वा दोन असे हाताच्या बोटावर मोजता येतील इतके च दैनंदिन रुग्ण आढळत असल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

करोनाच्या पहिल्या लाटेत अतिसंक्रमित भाग असलेल्या धारावीत दुसऱ्या लाटेतील रुग्णांची संख्या सुरुवातीपासूनच आटोक्यात होती. जूनच्या पहिल्या दिवसापासून दररोज एक अंकी दैनंदिन रुग्णांची नोंद होत आहे. एकमेकांपासून सुरक्षित अंतर ही संकल्पनाच जेथे अशक्य आहे अशा धारावीत दुसऱ्या लाटेला थोपवण्याचे आव्हान पालिकेपुढे होते. परंतु एप्रिलमध्ये जेव्हा मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली, तेव्हा धारावीत ८ एप्रिलला ९९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर मात्र तेथील रुग्णसंख्या घटू लागली होती.

मुंबईत गेल्यावर्षी करोनाचा प्रादुर्भाव होऊ लागला तेव्हा १ एप्रिलला धारावीत पहिला रुग्ण सापडला आणि पालिकेची यंत्रणा सतर्क झाली. चिंचोळ्या गल्लय़ांमध्ये खेटून असलेल्या झोपडय़ा आणि एकेका झोपडीत आठ ते दहा लोकांचे वास्तव्य असलेल्या धारावीत संक्रमण कसे रोखायचे असा गहन प्रश्न पालिकेपुढे होता. पण त्यावेळी पालिके च्या जी उत्तर विभागाने ज्या उपाययोजना के ल्या त्याला ‘धारावी मॉडेल’ म्हणून जगभरात ओळख मिळाली. मात्र रुग्णसंख्या ओसरल्यानंतरही संक्रमण रोखण्यासाठी पालिके च्या यंत्रणेने मेहनत घेतली. त्याबद्दल पालिके चे साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले, ‘‘जानेवारीत पहिली लाट ओसरत आली तेव्हाही धारावीत चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली. कामगार-कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. धारावीतील दवाखाने आणि पालिके च्या प्राथमिक आरोग्य केंद्रावरील  कोणतेही चाचणी केंद्र बंद करण्यात आले नाही. फिरत्या वाहनांमधून चाचण्या करण्यात आल्या. प्रतिजन चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले. विलगीकरण केंद्रे उभारण्यात आली. रुग्ण आढळले की त्यांचे अलगीकरण करण्यात येत होते.  घरोघरी जाऊन तपासण्या करणे अविरत सुरू होते.’’

लोकसंख्येचे आव्हान

साधारणपणे अडीच किलोमीटर परिसरात पसरलेल्या धारावीची लोकसंख्या सात लाख इतकी आहे. त्यातही स्थलांतरित कामगारांची संख्या मिळून ही संख्या साडे आठ लाखापर्यंत जाऊ शकते. एक किलोमीटर परिसरात अडीच लाख लोक इतकी दाट घनता या भागात आहे. धारावीत आतापर्यंत ६,८३५ जणांना करोनाचा संसर्ग होऊन गेला आहे.

फेब्रुवारीत धारावीतील दैनंदिन रुग्णसंख्या शून्य झाली होती तरी उपाययोजना थांबल्या नाहीत. आताही रुग्णसंख्या आटोक्यात असली तरी आम्ही घरोघरी जाऊन लक्षणे दिसताच रुग्णालयात येण्याचे आवाहन करतो. या सर्व उपाययोजनांचे हे फलित आहे.

– किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, जी उत्तर

‘धारावी मॉडेल’ काय? घरोघरी जाऊन दररोज चाचण्या करणे, रुग्ण शोधून काढणे, रुग्णांच्या संपर्कातील लोकांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्या करणे या पद्धतीने पालिकेच्या यंत्रणेने काम केले. पालिके च्या या उपाययोजना आता येथील लोकांच्या अंगवळणी पडल्या आहेत आणि लोकांचाही प्रतिसाद वाढू लागला आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.