गोकुळदास तेजपाल रुग्णालयात सुविधा उपलब्ध

सध्या सौंदर्य वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जात आहे. खासगी रुग्णालये आणि महागडय़ा पार्लरमध्ये दर महिन्याला हजारो रुपये खर्च करणाऱ्या महिला आणि पुरुषांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अशावेळी सर्वसामान्यांनाही वाजवी दरात या सुविधा मिळाव्यात, यासाठी मुंबईतील गोकुळदास तेजपाल (जीटी) रुग्णालयात अत्याधुनिक अशा ‘लेझर’ पद्धतीने उपचार सुरू झाले आहेत. जे. जे. मध्ये या प्रकारची सुविधा उपलब्ध आहे. त्या पाठोपाठ जीटीमध्येही ही सुविधा उपलब्ध झाल्याने रुग्णांची सोय होणार आहे. गेल्या आठवडय़ात दहा महिलांनी या उपचार पद्धतीचा फायदा घेतला.

चेहऱ्यावरील सिबम या तैलग्रंथीमुळे वाढणारे मुरुम व याचे डाग जाऊन चेहरा तजेलदार होण्यासाठी या लेझर पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय चाळीशीनंतर येणाऱ्या सुरकुत्या, सातत्याने येणारा घाम, चेहरा व मानेवरील टोचणारे चामखीळ या समस्यांवर जीटी रुग्णालयात लेझर पद्धतीने उपचार सुरू झाले आहे. ‘फ्रॅक्सिस डिओ’ नावाच्या उपकरणाच्या माध्यमातून हे उपचार सुरू आहेत. शुक्रवारी जे. जे. रुग्णालय समुहाचे प्रमुख डॉ. तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत या उपकरणाचे उद्घाटन झाले. या उपकरणाच्या माध्यमातून चेहऱ्यावरील मुरुमांचे डाग आणि सुरकुत्या कमी केल्या जातात. त्याशिवाय सातत्याने येणाऱ्या घामाचे प्रमाण कमी करण्यासाठीही या उपकरणाचा वापर होऊ शकतो.

चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी त्यावर ‘लेझर’च्या साहाय्याने प्रकाशकिरणे टाकली जातात. या प्रक्रियेने चेहऱ्यावरील डाग हळूहळू कमी होतात. डाग संपूर्ण नष्ट होण्यासाठी प्रत्येक महिन्याला एक असे चार ते सहा महिने लेझर उपचार आवश्यक आहे. तर वयाच्या चाळीशीनंतर येणाऱ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी ३ ते ४ वेळा लेझर उपचार केले जातात. त्याशिवाय सातत्याने येणाऱ्या घामाच प्रमाण कमी करण्यासाठी काखेतील स्नायूवर प्रक्रिया करून घामाचे प्रमाण कमी केले जाते, असे  त्वचा विभाग प्रमुख डॉ. उषा खिमाने यांनी सांगितले.

वाजवी दरात उपचार

खासगी रुग्णालयात लेझर उपचार पद्धतीसाठी हजारो रुपये आकारले जाते; मात्र सरकारी रुग्णालयात ही पद्धती सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांनाही हे उपचार करता येणार आहेत. दारिद्य्य्र रेषेखालील नागरिकांना ही सेवा मोफत असून इतरांसाठी प्रत्येक ‘लेझर’ सत्रामागे २०० रुपये आकारले जाणार आहे. ही रक्कम नाममात्र असून सामान्यांनी उपचाराचा लाभ घ्यावा, असे जीटी रुग्णालयाचे प्रमुख मुकुंद तायडे यांनी सांगितले.